Sangli Samachar

The Janshakti News

दिव्याखाली अंधार, महापालिकेचे नाट्यगृहच अठरा वर्षे सुरक्षा प्रमाणपत्राविना सुरू ?


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ११ ऑगस्ट २०२४
नाट्यसृष्टीत ज्या मराठी माणसाने इतिहास घडविला, त्याचे पहिले पाऊल ज्या नाट्यगृहाच्या रंगमंचावर पडले, ज्याची स्मृती नेहमी स्मरणात राहावी म्हणून मिरजेतील तत्कालीन नगरपालिकेने हंसप्रभा नाट्यगृहाचे बालगंधर्व नाट्यगृह असे नामकरण केले. महापालिका झाल्यानंतर या नाट्यगृहासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून नूतनीकरण केले. परंतु गेली 18 वर्षे हे नाट्यगृह केवळ स्नेहसंमेलन आणि चर्चासत्रापुरतेच उरले आहे, याचे कारण म्हणजे या नाट्यगृहाला सुरक्षा प्रमाणपत्र नसून, ती तर अनेक असुविधांनी हे बालगंधर्व नाट्यगृह वेढले गेले आहे. त्यामुळे 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार आहे.

कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा सुरक्षा प्रमाणपत्राचा विषय चर्चेत आला. सांगली मिरजेला नाट्यपरंपरेचा मोठा वारसा आहे. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह आणि मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह ही दोनच नाट्यगृह सध्या नाट्य रसिकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह अनेक सुविधांनी वेढले गेले असल्यामुळे याकडे नाट्य निर्मात्यांनी पाठ फिरवली आहे. सध्या हे नाट्यगृह नाटकांपेक्षा राजकीय हस्तक्षेपामुळे इतर कार्यक्रमामुळेच उपलब्ध करून दिले जाते.


नूतनीकरणानंतरही नाट्यगृहाला अतिक्रमणांनी वेढले असल्यामुळे केवळ एकाच प्रवेशद्वारातून नाट्यगृहात जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी ना अग्निशमनाच्या गाडीस किंवा रुग्णवाहिकेस प्रवेश करता येणे शक्य नाही. त्यामुळे अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र अद्यापही मिळालेले नाही. पश्चिमेकडील बाजूस महापालिकेच्या जागेतच दुकान गाळे आहेत. त्यांचे पुनर्वसन केले तर प्रवेशाचा मार्ग रिकामा होऊ शकतो. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे हा मार्ग बंद झाला आहे. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागानेही प्रतिपूर्ती प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने उष्म्यापासून वाचण्यासाठी पंख्यांचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे कार्यक्रमांच्या आवाजावर परिणाम होतो. याच कारणामुळे या ठिकाणी नाटकांचे प्रयोग होत नाहीत. केवळ सत्कार समारंभ, चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांना राजकीय हस्तक्षेपामुळे हे नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाते. अशा कार्यक्रमाच्या वेळी जर काही दुर्घटना घडली तर काय ? असा प्रश्न ना कार्यक्रम आयोजकांना पडतो, ना महापालिका यंत्रणेला. आणि म्हणूनच लोकाभिमुख महापालिका आयुक्त मा. शुभम गुप्ता यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी मिरजेतील नाट्य रसिकातून होत आहे.