Sangli Samachar

The Janshakti News

लाडकी बहीण-भाऊ यांना पैसे वाटताना, लाडक्या व्यापाऱ्यांस घाटावर पोहोचवलं की काय ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑगस्ट २०२४
सध्याची पूरस्थिती आणि दीर्घकाळ टिकून राहिलेलं पाणी, की जे कमी होतच नाही, हा विषय मोठा गंभीर आणि चिंतनाचा आहे. कुठंतरी गफलत होतेय, जी लोकांना समजत नाही, किंबहुना खरं पुढं आणलं जात नाही, आणि लोकांच्या जीवाशी अघोरी खेळ खेळला जातोय,असं चित्र, वास्तव आहे.

सांगली शहराने 2005-19-21 तीन महापूर अनुभवले आहेत. पण पाणी पातळी, आणि दीर्घकाळ टिकणारे पाणी प्रथम अनुभवास येत आहे. आलमट्टी ने 2019 सारखी भूमिका घेतली की कोयनेतून विसर्ग जास्त आहे ? जर आलमट्टी मधून विसर्ग सुरू आहे, तर मग इथली फुग का कमी होत नाही ? हा सामान्य प्रश्न लोकांना पडला आहे, पण वास्तव असं आहे की आलमट्टी चा विसर्ग हा त्यांना आवक जेवढी आहे, तेवढाच होतोय. त्यामुळे आधीची जी पातळी आहे, त्याची फुग ही तशीच आहे. जर काहीकाळ आधी 4 किंवा 5 लाख विसर्ग करण्यास त्यांना भाग पाडले असते, तर कदाचित इथं हे चित्र वेगळं आणि अनुकूल असतं. आम्हास असंही समजतंय किंबहुना एक व्हिडिओ व्हायरल झालाय की, महाराष्ट्र राज्यातून आलमट्टी ला पाणी जास्तीचे विसर्ग करण्याची प्रॉपर विनंती किंवा मागणीच नाही, असं तिथले अधिकारी सांगत आहेत. असं असेल तर मात्र हे अक्षम्य आहे. इथला कोण अधिकारी आहे ,त्याला पूरग्रस्त लोकांच्या ताब्यात द्या, जी शिक्षा द्यायची ती ते लोक देतील.


वास्तविक नियमानुसार पाणी साठवले जाते आणि विसर्ग होतोय का ? हे पाहणं अधिकारी बरोबर इथल्या लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्य आहे. पण त्या बाबतीत पाठपुरावा आणि संवेदनशील असं कोणतंही कृत्य निदर्शनास येत नाही. लोकप्रतिनिधी हे विजलेल्या दिव्यासारखे वागत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

राज्यसरकार-स्थानिक प्रशासन हे देखील या बाबतीत असंवेदनशील दिसत आहेत. पाणी येणार-घर सोडा इतकी घोषणा करण्या पलीकडे काहीही होताना दिसत नाही. आता सर्वात महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित होतोय, की पुढीलवर्षी किंवा दरवर्षी असं किंवा यापेक्षा गंभीर चित्र असणार का? मग यावर कोणत्या ठोस उपाययोजना करणार आहात ? हे इथल्या लोकप्रतिनिधी यांनी भूमिका स्पष्ट करा, सध्या पूरग्रस्त लोकांच्या-भागांच्या भेटी या येणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आहे. कदाचित पुढं निवडणूक नसती तर पूर नक्की आला असता, असं लोक म्हणत आहेत.

वास्तविक अशा वातावरणात सर्वच पक्षाच्या लोकांनी एकत्र अशा भेटी पूरग्रस्तांना द्याव्यात व एकत्र बसून पाणी पातळी कमी होण्यासाठी सरकार वर दबाव टाकून काम करावं, असं अभिप्रेत आहे. पण इथं राजकारण आणि श्रेयवाद यातून वर आलं तर हे समजेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार उभारणार असेल त्याने या महापूर या विषयावर आणि इथं अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कोणते ठोस प्रयत्न करणार आहे ? याचे लेखी स्वरूपात स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करावा, आणि मग मतं मागावीत,

सांगलीची बाजारपेठ ही अखंड पूरपट्ट्यात आहे, मागील एक महिना झालं लोक जीव मुठीत घेऊन व्यवसाय करत आहेत. पाणी येणार म्हणून माल मिळेल त्या ठिकाणी हलवून बसले आहेत. पण आता माल परत आणला आणि पाणी आलं तर काय करायचं ? या भीतीने तो माल पण आणत नाहीत. परिणामी मोठं नुकसान होतंय. बाजारपेठेला एक बकाल असं स्वरूप प्राप्त झालंय, याची चौकशी करायला एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही. याचा खेद आणि निषेध या माध्यमातून आम्ही करतो आहोत. वास्तविक कर आम्ही भरतोय. स्थानिक आणि राज्य संस्था आमच्या जीवावर चालतात. इथल्या सर्वच स्थानिक प्रशासनाचे खर्च आणि पगार आम्ही गोळा करून दिलेल्या करातून होतो. हे सोयीस्करपणाने तुम्ही विसरताय. पण कुठंतरी सहनशीलता संपेल आणि उत्तर मिळेल, ती वेळ येऊ देऊ नका.

दरवर्षी अशी स्थिती असेल, तर आमचा निकाल लावा. अन्यथा सर्वच सरकारी कार्यालये इथं बाजारात शिफ्ट करा आणि त्याठिकाणी बाजारपेठ करा, म्हणजे काय असतं ते तुम्हालाही अनुभवास येईल

लाडकी बहीण-भाऊ यांना पैसे वाटताना, लाडक्या व्यापाऱ्यांस घाटावर पोहोचवलं की काय ? कर हा विकासासाठी गोळा करून तुमच्या हवाली केला आहे, असं वाटण्यासाठी नाही. असं असेल तर लाडका व्यापारी पेन्शन योजना जाहीर करण्याचे धाडस सरकार ने करून दाखवावे. आज 15 दिवस झालं इथलं पाणी हटत नाही. मंत्रिमंडळात कुठंही याबाबतीत चर्चा झालेली दिसली नाही. आणि लोकप्रतिनिधी पाठपुरावा करताना सुद्धा दिसले नाहीत.

सांगलीच्या चार गल्यांच्या बाजारपेठेत गेल्या कित्येक वर्षात किती मोठी दुकानं निघाली ? हे आयुक्त,जिल्हाधिकारी तसेच विद्यमान आमदार, खासदार यांनी सांगावं आणि आत्मचिंतन करावं. किती नवीन व्यवसाय, दुकानं निघावेत म्हणून तुम्ही प्रयत्नशील आहात ? हे जरा पुराव्यासहित सांगा. उलट एखादा नवीन काही चालू करत असेल तर त्याला नानाप्रकारे त्रास देण्यात अधिकारी पटाईत आहेत.

आपण आमचे नेतृत्व करताय, पालक म्हणून मिरवताय, म्हणून जाणीव करून देत आहोत,
आपणांस या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की सदर पुरस्थितीतून लोकांना बाहेर काढावे, जर कोयनेतून विसर्ग वाढला तर इथं भयाण स्थिती होईल, त्याची जवाबदारी आपली असेल.