| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ९ ऑगस्ट २०२४
प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील आणि त्यांचे पवित्र पदस्पर्श झालेले कोल्हापूर येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे मराठी नाटकांचे माहेरघर. अनेक नाटकांनी येथे जन्म घेतला, कैक नाट्य अभिनेत्यांना प्रसिद्धीचे वलय मिळवून दिले. कित्येक नाटकांनी येथेच रोप्य महोत्सव साजरा केला. जितकं बोलावं तितकं कमीच. असे इतिहास घडवणारे संगीत शौर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल आगीच्या भक्षस्थानी नष्ट झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने नाट्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी या दुर्घटनेत खासबाग मैदानाचे स्टेज आणि त्याला लागूनच असलेलं हक्क थियटर जळून खाक झालं. ही आग विझवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु मोठ्या प्रमाणावर लाकडी बांधकाम असलेले ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह वाचवण्यात त्यांना दुर्दैवाने अपयश आले.
संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कला आणि क्रीडाप्रेमी असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकारानं या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. १९१३ ते १९१५ या काळात ते बांधलं गेलं. याचा रंगमंच २० फूट बाय ३४ फूट इतका प्रशस्त आहे. या नाट्यगृहाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रेक्षकांना रंगमंच पाहताना अडथळा ठरेल असा एकही खांब इथं नाही. या नाट्यगृहाची रचना देखील एखाद्या पॅलेस प्रमाणेच आहे. त्यावेळी या थिएटरचं नाव पॅलेस थिएटर असं होतं. सध्या त्याचं नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं.
उद्या आणि परवा याच नाट्यगृहात केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, केशवराव भोसले यांचा जीवनप्रवास आणि गानशैली तसेच त्यांच्याशी संबंधित छायाचित्रांचं प्रदर्शन असे कार्यक्रम इथं पार पडणार होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. पण तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्यानं कोल्हापूरकरांनी खंत व्यक्त केली आहे.