Sangli Samachar

The Janshakti News

'तुमच्यासाठी मी घर विकू काय ?' या वादग्रस्त वक्तव्याने अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० ऑगस्ट २०२४
महा आघाडीच्या सत्ता काळात उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांनी त्यावेळी दुष्काळग्रस्त परिस्थितीवर बोलताना, 'मी आता धरणात xxx काय ?' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून मोठा गहजब माजला होता. त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले होते. आता एका नव्या वक्तव्याने ते पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शिंदखेडा येथे एका महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका आशा सेविकेने खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोरच, 'आम्हाला लाडकी बहिणी योजनेत पैसे नको तर पगारवाढ द्या.' अशी मागणी केली. खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोरच असे वक्तव्य केल्याने अजित पवार खवळले. 

जाहीर समारंभात आशा सेविकेने म्हटले की, 'मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला पगारवाढीचे आश्वासन दिलं होतं मात्र त्याबाबतचा जीआर अजूनही निघालेला नाही. त्यामुळे आम्हाला लाडक्या बहिण योजनेतील पैसे नकोत पगार वाढ द्या !' या वक्तव्यावर अजित पवार यांनी रागातच म्हटले की, 'आता मी काय तुमच्यासाठी माझं घर-जमीन विकू काय ?' अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर समारंभात सन्नाटा पसरला.


परंतु यावर आशा सेविकेने येथेच न थांबता, आपले घराणे मांडले. यावेळी बोलताना ही आशा सेविका म्हणाली की, 'आम्हाला ते लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये नकोत, कारण आम्ही भरलेल्या टॅक्सचेच पैसे तुम्ही आम्हाला देत आहात. आमची मुले शिकलेली आहे त्याला नोकरी हवी आहे. दुष्काळात अनेक जण आत्महत्या करीत आहेत. कारण त्यांचे गरिबी त्यांना जगू देत नाही. मुलेही टोकाचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे यावर कायमचा तोडगा हवा आहे.

अजित पवार यांनी आशा सेविकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात न घेता, वादग्रस्त वक्तव्य केल्याने, खा. सुप्रिया सुळे यांनी गप्प राहणे पसंत केले मात्र अजित पवार हे पुन्हा विरोधकांच्या रडारवर आले आहेत. या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा कारण कंदर माजणार हे नक्की.