Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या नाट्य क्षेत्रातील कोहिनूर : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
एक श्रेष्ठ मराठी नाटककार, संपादक, राजकीय प्रश्नांचे चिकित्सक, अध्यात्मवादी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचा आज (२६ ऑगस्ट) स्मृतिदिन. २३ नोव्हेंबर १८७२ साली सांगली येथे त्यांचा जन्म झाला व शालेय शिक्षणही तेथेच झाले महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे फर्ग्युसन आणि डेक्कन महाविद्यालयांमध्ये. १८९२ मध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए. ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. १८९२-९४ मध्ये सांगली हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यानंतर मुंबईस कायद्याचा अभ्यास करून एल्एल्.बी. झाले.

१८९३ पासून त्यांनी आपल्या लेखनाला प्रारंभ केला. सवाई माधवराव यांचा मृत्यु या पहिल्या नाटकाचे लेखन ह्याच वर्षी झाले. १८९५ मध्ये तेविविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध झाले. १८९६ मध्ये विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध झालेल्या, महादेव शिवराम गोळे ह्यांच्याब्राह्मण आणि त्यांची विद्या (१८९५) ह्या ग्रंथावरील परीक्षणामुळे लोकमान्य टिळकांशी परिचय झाला व त्यातून त्यांचा पुढे केसरीशी संबंध आला. १८९६ मध्ये त्यांनी केसरीत 'राष्ट्रीय महोत्सव' हा लेख लिहिला. १८९७ मध्ये ते केसरीत दाखल झाले. लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केले. अध्यात्मनिष्ठ राष्ट्रवाद टिळकांप्रमाणे त्यांनीही पुरस्कारिला. आपल्या प्रखर राजकीय विचारांच्या समर्थनार्थ नाट्यलेखनाचाही आश्रय घेतला. 

१९०१ मध्ये 'गनिमी काव्याचे युद्ध' ही लेखमाला लिहिली. १९०२ मध्ये कौलांच्या कारखान्याचे निमित्त करून ते नेपाळमध्ये गेले आणि १९०५ मध्ये परत केसरीत दाखल झाले. १९०७ मध्ये तिसऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. १९०८ पासून टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते. १९१० मध्ये केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले. १९१३ मध्ये बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली. १९१४ मध्ये चित्रमयजगत्मध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला. १९१७ मध्ये पुण्यास नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.


 १९१८ मध्ये लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे विलायतेला गेल्यामुळे केसरीचे संपादकत्व त्यांनी स्वीकारले. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध सुटला. टिळकांनंतर खाडिलकर हे टिळक संप्रदायापासून वेगळे होऊन गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले.

१९२१ पासून मुंबईस लोकमान्य दैनिकाचे संपादन केले. १९२१ मध्ये गांधर्व महाविद्यालयातर्फे भरलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९२३ मध्ये त्यांनी लोकमान्य दैनिकाचे संपादकत्व सोडले. त्याच साली स्वत:च्या मालकीच्या नवाकाळ ह्या दैनिकाचे ते संपादक झाले. १९२५ मध्ये आठवड्याचा नवाकाळ सुरू केला. १९२७ मध्ये हिंदुमुसलमानांच्या वादावरील लेखाबद्दलनवाकाळवर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली. १९२९ मध्ये राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली. 

१९३३ मध्ये नागपूर येथे अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९३३-३५ पर्यंत सांगलीस दत्तमंदिरात ते योगविषयक प्रवचने देत. १९३५-४७ मध्ये त्यांनी अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले. १९४३ मध्ये सांगली येथे झालेल्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक उत्सवास खाडिलकरांनी संदेश पाठविला होता.

खाडिलकरांच्या उत्तरायुष्यात त्यांनी रुद्र, संध्यावंदन व पुरुषसूक्त, ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद, तैत्तिरीयोपनिषद,ॐकाराची उपासना, याज्ञवल्क्यमैत्रेयीसंवाद व त्रिसूपर्णाची शिकवणूक ह्या विषयांवरील अध्यात्मपर लेखन केलेल असले, तरी साहित्याच्या क्षेत्रात ते नाटककार व पत्रकार म्हणूनच मुख्यत: प्रसिद्ध आहेत. त्यांच्या महत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह खाडिलकरांचा लेखसंग्रह (भाग १ व २, १९४९) या नावाने प्रसिद्ध असून पहिल्या महायुद्धावरील त्यांच्या लेखमालेचे पाच भाग आहेत. 

त्यांच्या नावावरकांचनगडची मोहना (१८९८), सवाई माधवराव यांचा मृत्यु(१९०६), कीचकवध (१९०७), संगीत बायकांचे बंड(१९०७), भाऊबंदकी (१९०९), प्रेमध्वज(१९११), संगीत मानापमान (१९११), संगीत विद्याहरण (१९१३), सत्त्वपरीक्षा(१९१५), संगीत स्वयंवर(१९१६), संगीत द्रौपदी (१९२०),संगीत त्रिदंडी संन्यास (१९२३), संगीत मेनका (१९२६), सवती-मत्सर (१९२७) आणि संगीत सावित्री (१९३३) अशी एकंदर पंधरा नाटके आहेत. त्यांची गद्य नाटके शाहूनगरवासी आणि महाराष्ट्र नाटक मंडळींनी व संगीत नाटके किर्लोस्कर आणि गंधर्व नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणली.

मराठी रंगभूमीच्या आणि मराठी नाट्यवाङ्मयाच्या इतिहासात खाडिलकर या नावाला अनन्यसाधारण स्थान आहे. खाडिलकरांच्या लेखणीमुळे मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीला खरा वैभवाचा काळ लाभला. खाडिलकरांची नाट्यप्रतिभा सदैव इतिहासकाळात आणि पुराणकाळात रमली. त्या काळातील व्यक्ती आणि घटना यांत दडलेल्या प्रभावी नाट्याने तिला सतत आकर्षून घेतले. त्याचा तिने वर्तमानाच्या संदर्भात अर्थ लावला. भूताचा अर्थ वर्तमानाच्या संदर्भात लावणे, भूताचे वर्तमानाशी असणारे नाते व्यक्त करणे हा सदर प्रतिभेचा सहजधर्मच होता. तिला सतत भूतात वर्तमान दिसले व त्या दृष्टीने परिणामकारक नाट्यदर्शन घडविण्याचा तिने प्रयत्न केला. 

श्रीकृष्ण, कीचक, राम, कच, शुक्राचार्य, रामशास्त्री, राघोबादादा, आनंदीबाई, द्रौपदी, कंकभट ही एकापेक्षा एक अशी अविस्मरणीय पात्रे तिने मराठी रंगभूमीवर उभी केली. त्यांच्या जीवनाचे नाट्य जेवढा भूतकालीन घटनांवर प्रकाश टाकते, तेवढाच वर्तमानकालीन घटनांचा अर्थ लावते, असा प्रत्यय मराठी प्रेक्षकांना सतत आला. स्वाभाविकच कर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या त्यांच्या कीचकवध नाटकाच्या प्रयोगावर १९१० साली इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले. खाडिलकरांच्या नाटकांतील संवाद ज्याप्रमाणे अगदी सहजपणे पात्रांच्या परस्परभावसंबंधांचे नाट्य व्यक्त करतात, त्याचप्रमाणे त्यांच्या विविध भूमिकांमधून सूचित होणारे प्रभावी विचार-नाट्य व्यक्त करतात. खाडिलकरांचे असाधरण नाट्ययश त्यांच्या नाट्यप्रतिभेच्या ह्या विशेषांमध्ये आहे.

२६ ऑगस्ट १९४८ साली त्यांचे निधन झाले.