Sangli Samachar

The Janshakti News

किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा : ठाकरे गट !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ ऑगस्ट २०२४
सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी दोघांकडूनही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्याची जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीने निवडणूक झाल्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र इकडे महाआघाडीत मुख्यमंत्री चेहऱ्यावरूनच एकमेकांचा बुरखा कोरबडण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

मध्यंतरी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील असे सांगून गदारोळ उठवला होता. त्यावेळी शरद पवार आणि नाना पटोले यांनी राऊत यांची खरडपट्टी काढली. मात्र यानंतरही उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठत काँग्रेस हायकमांडकडे मुख्यमंत्रीपदाचे मागणी केली, त्यालाही केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र तरीही ठाकरे गट आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवण्याबाबत मागणी पुढे रेटत आहे.


ठाकरे गटाच्या या भूमिकेबाबत महाआघाडीतून आश्चर्य व्यक्त करत असतानाच, महायुतीतील नेत्यांनी ठाकरे गटावर, 'मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही किती लाचार होणार आहात ?' अशी बोचरी टीका केली आहे. विद्यमान विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठेंगा दाखवत महाआघाडीमध्ये दाखल होत मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर केवळ विरोधी पक्षातूनच नव्हे, तर जनतेतूनही प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. भाजपाने तर उद्धव ठाकरे यांच्या पार कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीने आता सावध भूमिका घेत, जनतेच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून, ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री ठरवण्यात येईल, असे शरद पवार आणि नाना पटोले यांच्याबरोबरच काँग्रेसच्या हाय कमांडनेही उद्धव ठाकरे यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे. तरीही ठाकरे गट मुख्यमंत्री पदाबाबत वारंवार मागणी करत असल्याने हा चेष्टेचा विषय बनला आहे.