Sangli Samachar

The Janshakti News

बदलापूरची ती मुख्याध्यापिका 'बाई आहे की हैवान ?' महाराष्ट्रात संतापाची नवी लाट !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ ऑगस्ट २०२४
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्याचा संताप महाराष्ट्रातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीकडून व्यक्त होत आहे. अशातच या शाळेच्या मुख्याध्यापिकेने तोडलेले अकलेचे कांदे ऐकून सर्वत्र पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. " बाई आहे की हैवान" अशा संताप जनक प्रतिक्रिया बदलापूर मधील प्रत्येक महिलेच्या तोंडून ऐकू येत आहेत. 

पिढीत बालिकेचा वैद्यकीय अहवाल घेऊन शाळेत गेलेल्या पालकांना, " या जखमा सायकल चालवताना झालेल्या असू शकतात !" असे संतापजनक वक्तव्य केले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीही आपल्याला धमकाविण्याचा आणि छळ केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे.


या आदर्श शाळेतील तीन साडेतीन वर्षांच्या ज्या दोन मुलीवर स्वच्छता करणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर, महाराष्ट्र हादरून गेला. सगळ्याच बाजूने दबाव आल्यानंतर संबंधित हैवानाला पोलिसांनी अटक केली खरी, परंतु आता ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून ज्या ज्या क्लृप्त्या वापरल्या गेल्या, त्या आता बाहेर पडू लागले आहेत. आणि त्यामुळे बदलापूर येथील पोलीस आणि संबंधित शाळेतील प्रशासन व व्यवस्थापकीय मंडळ यांच्यावरही कारवाईसाठी पुन्हा एकदा दबाव निर्माण होऊ लागला आहे.


या घटनेतील एका दुर्दैवी बालिकेच्या पालकांनी वैद्यकीय अहवाल घेऊन संबंधित शाळा मुख्याध्यापिकेला भेटले. तेव्हा त्या बाईंनी वरील प्रमाणे उद्गार काढले. यानंतर संबंधित पालक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना तेथे तब्बल 12 तास थांबवून ठेवले. तेथील स्थानिक मनसे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी 'साधी तक्रार' लिहून घेतली. . या तक्रारीतही पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे.

या नव्या घटनांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून यामध्ये दोष असलेल्या सर्वांवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाढत आहे. दरम्यान न्यायालयाने ही सरकारला या प्रकरणात खडे बोल सुनावले आहेत.