Sangli Samachar

The Janshakti News

चातुर्मास - आत्मकल्याणासाठी उपयुक्त !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश असून येथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. त्यापैकीच एक म्हणजे जैन धर्म. जैन धर्म हा एक पुरातन आणि स्वतंत्र धर्म आहे. या धर्माची तत्वे, तत्त्वज्ञान, पूजा पद्धती, आचार, विचार सर्व स्वतंत्र आहेत. या धर्मामध्ये अहिंसा, त्याग, संयम आणि दया याला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळेच जे वर्तमानकालीन 24 तीर्थंकर होऊन गेले, ते सर्व क्षत्रिय राजे असूनही बहुतेक वैभव, संपत्ती, राज्य, राजे पद यामध्ये न अडकता या सर्वांचा त्याग करून, इतकेच नव्हे तर, अंगावरील भरजरी वस्त्रे, दागदागिने उतरवून दिगंबर दीक्षा धारण करीत कठोर तपश्चरणाच्या परिणामी मोक्षाला गेले.

वर्तमानकालीन 24 वे तीर्थंकर भगवान महावीर होऊन गेलेल्याही आता 2550 वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर ही परंपरा असंख्य त्यागी, तपस्वी, मुनी, साधू, साध्वी यांच्या माध्यमातून सुरू राहिले आहे. आणि त्या परिणामीच आज आपल्याला संपूर्ण भारतभर सुमारे 2000 दिगंबर जैन साधू तसेच जैन साध्वी यांचे दर्शन घडू शकते.

सध्याच्या 21 व्या शतकातील बहुतेक प्रलोभनाच्या काळामध्ये सुद्धा सर्वस्वाचा त्याग करणारी अशी काही भव्य दिव्य व्यक्तिमत्व आहेत, हे पाहून खूप आश्चर्य वाटतं जैन परंपरेप्रमाणे पावसाळ्यातील चार महिने संपूर्ण बाहेरील सृष्टीमध्ये अत्यंत शीतलता असल्यामुळे अनंतानंत सुखमजीवांचे उत्पत्ती सातत्याने होत असते. जे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यालाही सहजासहजी दिसत नाहीत, असे अनेक जीव हवेत, पाण्यात, वातावरणात, सर्वत्र असतात. असे जैन तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले आहे, जे आज विज्ञानाच्या कसोटीवर ही आपल्याला साक्षात खरे असलेले दिसून येते. सूक्ष्मजीवांचे आपल्या विहारातून हिंसा-विराधना होऊ नये यासाठी हे त्यागी या चार महिन्यांच्या पावसाळ्यातील कालावधीमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करून असतात, याला जैन तत्त्वज्ञानामध्ये चातुर्मास किंवा वर्षायोग असे म्हटले जाते.


सध्या भारतामध्ये असलेल्या अनेक जैन साधूंच्या मधील एक अत्यंत कर्मठ, ज्ञानी आणि सातत्याने आत्मचिंतन करीत धर्मप्रभावना करणारा संघ म्हणजे, चर्या शिरोमणी 108 आचार्य श्री विशुद्ध सागर जी महाराज हे होत. आचार्य श्री आणि त्यांच्या संघातील 26 त्यागी, असा 69 मुनींचा चातुर्मास यावर्षी सांगली नजीकच्या नांदणी या जिनसेन मठामध्ये संपन्न होत आहे. हा जिनसेन मठही सुमारे ९०० वर्षे जुना असून, सुमारे ७०० गावे या मठाच्या अधिपत्याखाली येतात. परंपरागत मठाचे मठाधिपती प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारकपट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अभिनेतृत्वाखाली हा चातुर्मास संपन्न होत आहे. या चातुर्मासाच्या कालावधीत महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच प्रामुख्याने उत्तर भारतातूनही अनेक भक्तगण आचार्य श्री विशुद्ध सागर जी महाराज यांचा मंगलमय उपदेश ग्रहणासाठी, महाराजांच्या मंगलमय सानिध्यामध्ये येत आहेत.

या दृष्टीने ही संपूर्ण व्यवस्था अत्यंत सुंदर अशा रीतीने सांभाळण्यासाठी चातुर्मास कमिटीची स्थापना करण्यात आलेली असून, या कमिटीच्या अध्यक्षपदी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा नागरी पतसंस्थेचे चेअरमन तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सातत्याने क्रियाशील असणारे तन, मन, धनाने सातत्याने समाजाच्या पाठीशी उभे राहणारे सांगली येथील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. रावसाहेब जनगोंडा पाटील यांची या चातुर्मास कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

या चातुर्मासाच्या माध्यमातून अनेक उपक्रम नांदणी आणि परिसरामध्ये संपन्न होत आहेत. यामध्ये 15 ऑगस्ट रोजी भारतासाठी बलिदान दिलेल्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्वत संमेलन, भट्टारक संमेलन, युवक युवती संमेलन, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण असे अनेकविध उपक्रम या चातुर्मासाच्या माध्यमातून संपन्न होत आहेत, होणार आहेत. श्री रावसाहेब पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून या चातुर्मासामध्ये आपला अत्यंत सक्रिय सहभाग दिलेला आहे.

त्यागी, मुनी, तपस्वी ही जैन धर्माने संपूर्ण समाजाला दिलेली एक देणगी असून, असा विशाल त्यागी संघ सध्या नांदणी येथे वास्तव्याला असून, त्यांच्या मंगल सानिध्यात संपन्न होत असलेल्या, विविध उपक्रमांचा दररोज सकाळी आणि दुपारी होत असलेल्या महाराजांच्या मंगल प्रवचनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन दक्षिण भारत जैन सभा आणि चातुर्मास कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

श्री. अजित जगोंडा पाटील,
सांगली.