Sangli Samachar

The Janshakti News

घाम गाळून स्वाभिमानाने जगणाऱ्या कष्टाळू महिला राष्ट्रीय कार्य करतात - प्रा. विजयादेवी पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
ऑल इंडिया एन.जी.ओ फेडरेशन, सेवा फाऊंडेशन व लाडकी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्र.९ मधील १००० गरजू महिलांना मोफत साडी वाटप मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. विजयाताई पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. विजया पृथ्वीराज पाटील म्हणाल्या, आज भावाच्या उपवासादिवशी पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवी संस्थांनी गरजू कष्टकरी महिलांना साड्या वाटप केल्या ही घटना म्हणजे श्रीकृष्णाने द्रौपदीचा केलेला सन्मानच आहे. गोरगरीब महिलांना मदत करणे, त्यांच्या कष्टाचा आदर करणे हे खरे मानवतावादी कार्य आहे. पृथ्वीराजबाबा कायम घाम गाळून कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान करतात, असे प्रा. सौ. पाटील म्हणाल्या.


महापूर व कोरोना काळात त्यांनी केलेली सांगलीकरांची सेवा अविस्मरणीय आहे. असे सांगून प्रा. सौ. विजयाताई पाटील म्हणाल्या की, आज एक हजार महिलांना साड्या देऊन त्यांचे माहेरपणाची ऐतिहासिक कामगिरी ऑल इंडिया एन.जी.ओ फेडरेशन, सेवा फाऊंडेशन व लाडकी सेवाभावी संस्था या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.या उपक्रमातून महिलांचा सन्मान करणारी महाराष्ट्राची संस्कृती अधोरेखित होते.छ. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन आणि रायगडाच्या बुरुजाला हिरकणीचे नाव देऊन जो महिलांचा सन्मान केला त्याची आठवण झाली. सांगलीच्या घराघरात महिलांचा सन्मान झाला पाहिजे हा संदेश या साडी वाटप उपक्रमातून राज्यभर गेला आहे.

यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आई ही पृथ्वीपेक्षा महान आहे, महिलांचा सन्मान हा संविधानाचा गौरव असून मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. महिलांना संपत्तीचा हक्क द्या.. पृथ्वीराज पाटील हे कायम कष्टकरी महिलांचा आदर व मदत करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा साडी वाटप उपक्रम राबवून अल्ताफ पेंढारी, प्रशांत माने व इरफान केडीया यांनी मानवतावादी कार्य केले आहे.

सुहास वांजूळे यांनी यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या समाजसेवी कामाचे व या स्वयंसेवी संस्थांच्या साडी वाटप उपक्रमाचे कौतुक केले. 

स्वागत व प्रास्ताविक प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. आभार अल्ताफ पेंढारी यांनी मानले. ऑल इंडिया एन.जी.ओ फेडरेशनचे प्रशांत माने, सेवा फाऊंडेशनचे इरफान केडिया आणि लाडकी सेवाभावी संस्थेचे अल्ताफ पेंढारी यांनी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुभद्रा गोरे, भारत दुधाळ, प्रा. गावडे,स्नेहल गौंडाजे, प्रा. एन. डी. बिरनाळे, बिलकीस केडिया, पत्रकार सुहास वांजूळे व प्रभागातील कार्यकर्ते व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.