Sangli Samachar

The Janshakti News

काळ्या कायद्याने शिक्षण क्षेत्राचा श्वास गुदमरतोय, तुटपुंज्या तरतूदीमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगतीला खो - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑगस्ट २०२४
जगातील छोट्यातछोटे देशही शिक्षणावर भरपूर खर्च करतात. केंद्रात महाआघाडी सरकार असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणासाठी प्राधान्याने जीडीपीच्या सव्वा पाच टक्के तरतूद केली परंतु दुर्दैवाने मोदी सरकारच्या बजेटमध्ये शिक्षणासाठीची तरतूद अडीच टक्क्यावर आली. राज्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले आहे. राज्यात महाआघाडी सरकार येताच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल. असे प्रतिपादन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित सांगली जिल्हा शैक्षणिक व्यास पिठाच्या विराट मोर्चात आंदोलक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालकासमोर ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, शिक्षणात संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळा महाविद्यालये चालवणे मुश्किल झाले आहे. शासनाने या सर्व घटकांचे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत. शिक्षण क्षेत्रासाठी तुटपुंजी आर्थिक तरतूद ही महाराष्ट्राच्या प्रगतीला खो घालते. १५ मार्च २०२४ चा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे. पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झाली आहे ती रद्द केली पाहिजे. सर्व शाळा महाविद्यालयांत शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे. अशीच एकजूट ठेवा. शिक्षण संस्था चालक आणि शिक्षक म्हणून मला या क्षेत्रातील घटकांच्या व्यथा वेदना माहित आहेत. मला हाक द्या. आपले प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचा कायम आपल्याला पाठिंबा आहे. असे पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे. 


आज सकाळी बारा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास अभिवादन करुन विराट मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात जिल्ह्यातील २८ संघटना सहभागी झाल्या होत्या. एकच मिशन - जुनी पेन्शन, १५ मार्चचा काळा कायदा रद्द करा, शाळा तेथे मुख्याध्यापक पद दिले पाहिजे , शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे इ. विविध १६ मागण्यावरील घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रावसाहेब पाटील, आर. एस. चोपडे यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी शासनाने पावले उचलावीत असे सांगितले. विविध संघटना प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली. 

या मोर्चात रावसाहेब पाटील,आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे, आटपाडीचे रावसाहेब पाटील, संजय दुधाळ, भगवानराव साळुंखे,जे. एस. पाटील आप्पा, प्रा. एन.डी.बिरनाळे,संजयकुमार झांबरे , राजेंद्र नागरगोजे ,अमोल शिंदे,अमोल माने, विजय कांबळे, बाळासाहेब कटारे, अरविंद गावडे, प्रशांत चव्हाण, फैसल पटेल, एस. वाय. जाधव, अरविंद जैनापुरे,सुधाकर माने, जे. एस. पाटील, संजय कदम, शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.