Sangli Samachar

The Janshakti News

पतीशी भांडण करून निघालेली महिला देवगड येथे पोहोचली... पुढे काय झाले ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑगस्ट २०२४
घर म्हटले की वाद विवाद आलेच. विशेषतः सासू-सून किंवा पती-पत्नी यांच्या छोट्या मोठ्या असतात. परंतु बऱ्याच वेळा हे पेल्यातील वादळ ठरते. काही वेळा हे भांडण उग्र स्वरूप धारण करते. अगदी घटस्फोट, जीवे मारणे असे प्रकार हे घडतात. अगदी चारच दिवसांपूर्वी अशाच भांडणातून सांगलीतील गजबजलेल्या कॉलेज कॉर्नरजवळ अवघ्या सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केला होता.

याचीच पुनरावृत्ती याच सांगलीत पुन्हा एकदा घडली. पण पतीने हल्ला करण्याने नव्हे, तर पत्नीने जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देत घर सोडले. यापूर्वीही या महिलेने अशी धमकी देऊन घर सोडले होते. त्यामुळे घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान ही महिला देवगड येथे पोहोचली. संध्याकाळपर्यंत वाट पाहून सदर महिलेचे कुटुंबीय सांगलीतील माजी नगरसेविकेला सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीनंतर सदर महिलेचे मोबाईल वरून लोकेशन शोधले असता, ते चक्क देवगड येथे मिळून आले.

सांगली पोलिसांनी ही माहिती देवगड पोलिसांना कळविल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस स्थानकामध्ये नेमणुकीवर असलेल्या ठाणे अंमलदार, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अन्विता कदम, महिला पोलीस कॉन्स्टेबल दर्शना देवगडकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर चौगुले यांना सदर महिलेच्या शोधकामी रवाना करण्यात आले.

देवगड एसटी स्टँड वर सदर महिलेचा शोध घेतला, तेथे चौकशी केली. प्रसंगी सीसीटीव्ही मधूनही तपास केला.. यावेळी सदर महिला देवगड येथील एका कॉम्प्लेक्स नजीकच्या घरात सुस्थितीत असल्याची माहिती मिळताच, पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन ही माहिती सांगली पोलिसांना कळविण्यात आली. तेव्हा नातेवाईकांनी देवगड येथे जाऊन त्या महिलेची समजत घातली व तिला ताब्यात घेतले. सांगली व देवगड पोलिसांनी तत्परतेने सदर महिलेचा शोध घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याबद्दल चांगली व देवगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.