Sangli Samachar

The Janshakti News

शालेय विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरत राहावे, असे आव्हान जिल्हाधिकारी व डॉ. राजा दयानिधी काल झालेल्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल आढावा बैठकीत बोलताना, डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत शालेय समित्या कार्यान्वित कराव्यात. जर त्या नसतील तर त्यांची तात्काळ स्थापना करावी, मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर प्रत्येक स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवावी. त्या तक्रारींचा आढावा प्रत्येक आठवड्यात घ्यावा. जर एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास त्यावर त्वरित कडक कारवाई करावी. मुला, मुलींची स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरुद्ध दिशेने करावी. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. या सीसीटीव्हीच्या फुटेज 30 दिवसासाठी संरक्षित करण्यात यावेत. जर दुर्दैवाने एखाद्या शाळेत अत्याचारासारखा गुन्हा घडल्यास, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा. अशी घटना घडल्यास 1098 या चाईल्ड लाईन हेल्पलाइन क्रमांकावर अथवा पोलीस विभागाच्या 112 क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवावी. अत्याचाराच्या घटना घडुच नयेत यासाठी सर्व खाजगी, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित त्वरित बैठका घ्याव्यात. त्याचबरोबर सर्व कायम, अंशकालीन, हंगामी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र शाळांनी घ्यावेत, असे आव्हान जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी यावेळी केले.


जिल्ह्यात 2792 शाळा असून त्यापैकी 627 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत. उर्वरित शाळांनी सीसीटीव्ही बसवून घ्यावेत. शून्य महिला शिक्षक असणाऱ्या शाळांचा आढावा घेण्यात यावा. सखी सावित्री समितीची बैठक, सेविका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्को गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रशिक्षित तज्ञामार्फत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. मुलांना समजेल अशा भाषेत बाल समुपदेशकामार्फत 'गुड टच, बॅड टच' याबाबत समुपदेशन करण्यात यावे. अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी केल्या.


शालेय तालुका व जिल्हास्तरीय समित्या त्वरित स्थापन करण्यात याव्यात, प्रत्येक शाळेत, संस्थेत स्वतंत्र चेंजिंग रुम निर्माण करण्यात यावी. पालक, शिक्षक यांची नियमित बैठक घेण्यात यावी. मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचे असेल, त्या सर्व उपाययोजना संबंधित शाळा, महाविद्यालयाने कराव्यात. जर एखाद्या स्कूलबसचे फिटनेस सर्टिफिकेट नसेल तर आरटीओने अशा बसेसना विद्यार्थी वाहतुकीसाठी परवानगी देऊ नये. असे निर्देश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या बैठकीत दिले.

यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सर्वसाधारण तहसीलदार लीला खरात, खाजगी शाळा संघटनेचे सचिव राजेंद्र नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.