Sangli Samachar

The Janshakti News

खा. विशालदादा पाटील यांची सांगली मिरजेतील शासकीय रुग्णालयांना अचानक भेट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे खा. विशालदादा पाटील यांनी अचानक भेट देऊन रहिवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या आंधळा कारभाराचा प्रत्यय खा. पाटील यांना आला. यावेळी येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी अडचणींचा पाढाच वाचला.

होस्टेलच्या व हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरातील मवाली, व्यसनी तसेच चोरटे येऊन रहिवासी विद्यार्थिनींना विचित्र चाळे करून त्रास देतात. तसेच रुग्णालयाच्या वस्तीगृहाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, येथे सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईटचा अभाव आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत पण ते बंद अवस्थेत आहेत. येथील तीन बिल्डिंगसाठी केवळ एकच वॉचमन आहे. गर्ल्स हॉस्टेलच्या परिसरात गांजा पार्टी रंगतात. तसेच समोरील कावेरी नावाच्या बिल्डिंगमध्ये आसपासच्या मवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. तिथे बसून गांजा फुंकतात व समोरच्या होस्टेलमध्ये मुलींचे व्हिडिओ चित्रण करतात. येथील परिसरातील तरुण मुलींची छेडछाड करतात. ही आता नेत्याची बाब झाली आहे. येथील विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत अशा तक्रारी तेथील निवासी वैद्यकीय विद्यार्थिनींनी केल्या.

यानंतर खा. विशाल पाटील यांनी प्रशासनाची कानउघडणी करीत, या विद्यार्थिनींच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ उपायोजना कराव्यात, असे कडक शब्दात सुनावले. या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवण्याबरोबरच, सर्वत्र टीव्ही बसवण्यात यावेत, त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावीत अशा सूचनाही खा. पाटील यांनी केल्या.

यावेळी खा. विशालदादा पाटील यांच्या समवेत यांच्या पत्नी सौ पूजा पाटील अधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव, मेडिकल सुप्रीटेंडेड डॉ. रुपेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी, 'मी सक्षमा' व्यवस्थापिका गीतांजली पाटील, वसंत दादा साखर कारखान्याचे संचालक अमितकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सावनकुमार दरुरे आदी मान्यवर उपस्थित होते.