Sangli Samachar

The Janshakti News

कोणतीही कृती करण्यापुर्वी, ती या चार दरवाज्यातून पार करा ! (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २९ ऑगस्ट २०२४
आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या काळात, सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री फिरून झोपी जाण्यापर्यंत, प्रत्येक क्षणाला आपण कांही ना कांही कृती करीत असतो. आपल्या प्रत्येक कृतीचे चांगले-वाईट परिणाम हे आपल्याला कधी ना कधी भोगावे लागतात, हा कर्माचा सिद्धांत आहे. त्यामुळे कोणतीही कृती करण्यापुर्वी, ती करावी की न करावी याचा निर्णय विचारपूर्वक विवेकबुद्धीने घेणे अत्यंत महत्वाचे व जरूरीचे आहे.  

पण मन ओढाळ आहे. विचारपूर्वक विवेकबुद्धीने निर्णय घेण्यास सहजासहजी तयार होत नाही, उलट गोड, भुरळ पाडणारा चुकीचा विचार उत्पन्न करून भ्रम निर्माण करते. कोणतीही कृती करण्यापुर्वी विचारपूर्वक विवेकबुद्धीने निर्णय घेण्यास भटक्या मनाला तयार करण्यासाठी, एखादे टेक्निक-तंत्र वापरावे लागते.  


माझा एका मित्र - सुमन, कोणतीही लहान-सहान कृती करण्यापुर्वी विचारपूर्वक विवेकबुद्धीने निर्णय घेण्यासाठी, संत रूमीच्या “आपले शब्द उच्चारण्याआधी ते तीन दरवाज्यामधून पार करा“ या सुप्रसिद्ध वचनाचा-1 आधार व त्याच्याशी साम्य असणारे एक टेक्निक-तंत्र, “कोणतीही कृती करण्याआधी ती चार पाय-यामधून पार करा,” वापरत असतो. या तंत्राचा वापर करून सुमनने आपल्या कॉफी पिण्याच्या इच्छेवर योग्य निर्णय कसा घेतला याची हकीकत मला नुकतीच समजली. 

कांही दिवसांपूर्वीची घटना. सकाळची न्याहरी संपवल्यावर अचानक सुमनला नेस कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली. दिवसाकाठी किमान २-३ मोठे कप चहा-कॉफी पिण्याची आपली वाईट सवय, गेल्या दिड-दोन वर्षांमध्ये सुमनने मनोनिग्रहाने दिवसातून फक्त एकवेळ, तेही संध्याकाळी अर्धा कप चहा पिण्याइतपत नियंत्रित केली होती. त्यामुळे त्या दिवशी कॉफी पिण्याची इच्छा मनात आल्यावर सुमन विचार करू लागला. 
“गेली दीड-दोन वर्षांनंतर आज पुन्हा कॉफी पिण्याची जबरदस्त इच्छा झाली आहे. काय करावे, कॉफी प्यावी की नको ?”   


“इच्छा झाली तर कधीतरी एखादा कप कॉफी प्यायला काय हरकत आहे? त्याने कांही फार मोठा फरक पडणार नाही. माणसाने पक्ष्याप्रमाणे मुक्त, स्वच्छंदी, स्वतंत्र जीवन जगावे. जीवनामध्ये मिळालेला प्रत्येक क्षण उपभोगावा, आनंदाने जगावा. मन मारून जगण्यात काय अर्थ आहे?“

सुमनच्या मनातील एक कोपरा कुजबुजला.  
त्यावर सुमनच्या मनातील दुस-या कोपरा सांगू लागला, 


“इच्छा कधीही तृप्त होत नसतात. तृप्त होणारी इच्छा नेहमी दुस-या इच्छेला जन्म देते आणि हे चक्र अव्याहत सुरू राहाते. गरजा पूर्ण होऊ शकतात, पण इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. गरजा नैसर्गिक असतात तर, इच्छा विपर्यस्त, विकृत, भ्रष्ट, धोकादायक, विसंगत, अनैतिक, दुष्ट, हीन, चुकीच्या आणि वाईट असतात,” - ओशो

एका माणसाने गौतम बुद्धांना विचारले, 
"मला आनंद हवा आहे." बुद्ध म्हणाले, 

"प्रथम 'मी' काढून टाका, तो अहंकार आहे, नंतर ‘इच्छा’ काढून टाका, ती इच्छा आहे. आता बघा, तुमच्याकडे फक्त "आनंद" उरला आहे."

वाईट सवयी मुंगीच्या पावलांनी लागत असतात पण नंतर आक्राळ-विक्राळ रूप धारण करतात. कधीतरी एक कॉफी पिण्याची कृती दररोज किमान २-३ मोठे कप चहा-कॉफी पिण्याच्या वाईट सवयीस कारण होऊ शकते. म्हणून ‘एकच प्याला’ पासून नेहमी सावध असावे.

“चांगल्या सवयी तुमच्या उत्तम मदतनीस असतात. चांगल्या कृतींच्या द्वारे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे बळ जतन करा. वाईट सवयी तुमच्या अत्यंत नीच शत्रू असतात. त्या तुमच्या इच्छेविरूद्ध तुम्हाला अपायकारक अशा कृती करायला लावतात. त्या तुमच्या शारीरिक, सामाजिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक आनंदाला मारक असतात. त्या वाईट सवयींना यापुढे वाईट कृतीरूपी खाद्य देण्याचे नाकारून नष्ट करा. ” - श्री श्री परमहंस योगानंद

“खरे स्वातंत्र्य हे योग्य निर्णय घेऊन व ऐच्छिक निवड यांना अनुसरून कृती करण्यात असते - खाणे, वाचणे, काम करणे व अशा इतर कृतींमध्ये, आपल्याला लागलेल्या सवयींच्या सक्तीने करण्यात खरे स्वातंत्र्य नव्हे. जे तुम्ही खायला पाहिजे ते खावे, तुम्हाला ज्याची सवय लागली आहे तेच खाण्याची आवश्यकता नाही. वाईट सवयी आपल्याला जे हुकूम करतात, त्या गोष्टी नव्हे, तर ज्या गोष्टी तुम्ही करायला हव्या त्याच करा.“ - श्री श्री परमहंस योगानंद, 

मनातील कोप-यांच्या या उलटसुलट विचारांनी सुमन संभ्रमात पडला आणि कॉफी पिण्याची आपली कृती करण्यापूर्वी, त्यावर विचारपूर्वक विवेकबुद्धीने योग्य निर्णय घेण्यासाठी, 
“कोणतीही कृती करण्यापुर्वी ती चार दरवाज्यातून पार करा” या टेक्निक-तंत्रांचा वापर केला.   

पहिल्या दरवाज्यावर सुमनने स्वतःला विचारले, "ही कृती मी माझी गरज, प्रबळ इच्छा, सवय या पैकी कोणत्या कारणामुळे करणार आहे?"

दुस-या दरवाज्यावर सुमनने स्वतःला विचारले, 
"या कृतीचे दूरगामी परिणाम माझ्यासाठी काय आणणार आहेत - आनंद, सुख, शांती, समाधान की, अनारोग्य, क्लेश, अस्वस्थता, दुःख?"

तिसर्‍या दरवाज्यावर सुमनने स्वतःला विचारले, "ही कृती मी भावनेच्या आहारी जाऊन करत आहे कां ?"

आणि शेवटच्या चौथ्या दरवाज्यावर सुमनने स्वतःला विचारले, 
"मनातील इच्छा, सवयीप्रमाणे कृती करणे म्हणजे, कोण कुणाला नियंत्रित करीत असते? मी माझ्या मनाला कि माझे मन मला ?"

या चार दरवाज्यातून सुमनने त्याची कॉफी पिण्याची नियोजीत कृती पार केली. प्रत्येक दरवाज्यातील प्रश्नावर मिळालेल्या उत्तरावर विचार केला आणि विवेकबुद्धीने निर्णय घेतला. त्या दिवशी सुमनने कॉफी पिण्याचा आपला बेत रद्द केला.   

कोणतीही कृती करण्यापुर्वी विचारपूर्वक विवेकबुद्धीने निर्णय घेण्यासाठी ती चार दरवाज्यातून कृती पार करायचे, सुमन वापरत असलेले टेक्निक-तंत्र मला, एका सामान्य माणसाला समजले आणि मी विचार करू लागलो. माझ्या आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या, दैनंदिन जीवनात मलाही हे टेक्निक-तंत्र कोणतीही कृती करण्यापूर्वी विचारपूर्वक विवेकबुद्धीने निर्णय घेण्यासाठी वापरता येऊ शकेल कां? माझे विचारमंथन सुरू आहे.... 
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण