Sangli Samachar

The Janshakti News

भारताला जागतिक हब म्हणणे घाईचे ठरेल, नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती !


| सांगली समाचार वृत्त |
प्रयागराज - दि. २० ऑगस्ट २०२४

भारताला सध्या जागतिक हब किंवा ग्लोबल लीडर म्हणणे घाईचे ठरणार असल्याचे स्पष्ट मत देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेले नारायण मूर्ती यांनी व्यक्त केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दीक्षांत समारंभात नारायण मूर्ती बोलत होते.

सध्या अनेक अर्थतज्ञ आणि तज्ञांच्या मतापेक्षा नारायण मूर्ती यांनी वेगळे मत मांडले आहे. अनेक तज्ञ भारताच्या वाढत्या लोकसंख्येला समस्या ऐवजी वरदान म्हणून संबोधत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून ते म्हणाले की, चीन हा मोठा निर्यातक्षम देश मानला जातो. सध्या सुपर मार्केट आणि होम डेपोमध्ये विकल्या जाणाऱ्या सुमारे 90 टक्के वस्तू चीनमध्ये बनवण्यात येतात. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार भारताच्या सहापट आहे. त्यामुळे भारत सध्या तरी मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल असे म्हणणे घाईचे ठरणार असल्याचे नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. 


भारताची वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या ठरणार आहे. यात प्रामुख्याने दरडोई जमिनीची उपलब्धता, आरोग्य सुविधा, रोजगार, वाढती महागाई ही मोठी आव्हाने देशासमोर आहेत. या तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीन सारख्या देशांमध्ये दरडोई जमिनीची उपलब्धता अधिक आहे. आणीबाणी नंतर आपण या समस्येकडे लक्षच दिलेले नाही, त्यामुळे आता ही समस्या आव्हानात्मक बनल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. 

नारायण मूर्ती हे जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती असून, अर्थतज्ञ हे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या विधानाला आधीच महत्त्व आहे. आगामी काळात या सर्व समस्यांना योग्य पद्धतीने तोंड दिले नाही, तर देशाची अधोगती निश्चित असल्याचे मूर्ती यांच्याप्रमाणेच इतर अर्थतज्ञ यांचेही म्हणणे आहे.