Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 92 टक्के अर्ज मंजूर, उर्वरितांना संधी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
सांगली जिल्ह्यात प्राप्त झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील 92. 2 % अर्ज मंजूर करण्यात आले असून, या योजनेत एकूण चार लाख 59 हजार 827 आज पर्यंत प्राप्त झाले होते. त्यापैकी 4 लाख 24 हजार 211 अर्ज मंजूर करून ते राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेले आहेत. केवळ 33 हजार 313 अर्ज अंशतः अमान्य करण्यात आले असून, या अर्जातील त्रुटी दूर करून ते अर्ज पुन्हा भरावेत. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संदीप यादव, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


या योजनेतील अंशतः अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधितांना कळविण्यात आल्या असून, संबंधितांनी त्या त्रुटींची पूर्तता तात्काळ करावी. या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून, त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट 2024 अखेर मंजूर झाले आहेत, त्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा होणार आहेत. त्याच वेळी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून, त्यासाठी तेथील पालकमंत्री हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ही ना. खाडे यांनी यावेळी दिली. या पुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही नियमितपणे सुरू राहणार असून, ही योजना कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.