yuva MAharashtra भारतीय दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारी अभिमानास्पद घटना !

भारतीय दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारी अभिमानास्पद घटना !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ जुलै २०२४
जगभरात 'मास ट्रान्झिट सिस्टीम्स'साठी नवतंत्रज्ञानाची चाचपणी सुरू असताना, भारतात आशियातील पहिला 'हायपरलूप' ट्रॅक चाचणीसाठी सज्ज होतोय. इतकेच नव्हे, तर एका स्पर्धेअंतर्गत हा ट्रॅक जगभरातील युवा संशोधकांनाही आपल्या 'पॉड्स'सह चाचणीसाठी आमंत्रित करतो आहे. ही सर्वार्थाने भारताच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडविणारी घटनाच म्हणायला हवी. भारताची 'हायपरलूप' तंत्रज्ञानाच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू आहे.

इलेक्ट्रिक कार कंपनी 'टेस्ला' आणि अंतराळ प्रवास कंपनी 'स्पेसएक्स'नेही 'हायपरलूप' तंत्रज्ञानाची चाचणी केली आहे. 'व्हर्जिन हायपरलूप'ची पहिली चाचणी दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे ५०० मीटरच्या ट्रॅकवर एका 'पॉड'आधारे करण्यात आली होती. यामध्ये एक भारतीय आणि अन्य प्रवासी सहभागी होते. यावेळी 'पॉड'चा वेग १६१ किलोमीटर प्रतितास इतका होता.अशा या 'हायपरलूप' तंत्रज्ञानावर संशोधन करणारा भारत हा एकमेव देश नाही. दुबई आणि अबूधाबीला 'हायपरलूप'ने जोडण्यासाठी योजना विकसित केल्या जात आहेत. मेक्सिको सिटी आणि ग्वाडालजारादेखील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहे.


भारत ही सर्वात वेगाने वाढणारी जागतिक अर्थव्यवस्था तर आहेच. शिवाय भारतात मोठ्या संख्येने तरुण कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. म्हणूनच आज भारत जागतिक दर्जाचे उच्च-तंत्र अभियांत्रिकी कौशल्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे 'हायपरलूप' तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी भारत ही एक आदर्श बाजारपेठ ठरू शकते. भारतातील 'हायपरलूप' तंत्रज्ञानातील प्रयोगांना सुलभ करण्यासाठी आणि वास्तविक जागतिक पातळीवरील त्याची व्यवहार्यता प्रमाणित करण्यासाठी आता 'आयआयटी मद्रास'चे सेंटर जागतिक पातळीवर 'हायपरलूप' तंत्रज्ञानावर संशोधकांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास प्रा. सत्य चक्रवर्ती, प्राध्यापक सल्लागार, 'आविष्कार हायपरलूप', 'आयआयटी मद्रास' यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

'हायपरलूप' ही लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी एक हाय-स्पीड वाहतूक व्यवस्था आहे. यामध्ये 'व्हॅक्यूम ट्यूब'मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिकली लेव्हिटेटिंग 'पॉड'चा समावेश असतो, ज्यामुळे घर्षण आणि एअर ड्रॅग दूर होते. विद्युत चुंबकीय पद्धतीने हे 'पॉड' रुळांवरून पुढे सरकतात. ही क्रिया अतिशय वेगाने होत असल्याने आणि कोणतेही प्रत्यक्ष घर्षण नसल्याने याद्वारे ताशी एक हजार किमी वेगानेही प्रवास करता येतो. वाहतुकीचा हा प्रकार विमानाच्या दुप्पट वेगाने गंतव्य स्थानावर पोहोचवेल. 24 तास संचालनासाठी ऊर्जा संचयन होत असल्याने विजेचा वापर कमी होतो. एकूणच 'हायपरलूप' हे सौर किंवा विद्युत ऊर्जेवर चालणार्‍या वाहतुकीचे शाश्वत माध्यम असेल.