| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० जुलै २०२४
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधांची विक्री करणाऱ्या रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने 'त्या' 14 उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश दिले होते. या कथित जाहिरातीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याबाबत दाद मागितली होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही बाजारात या औषधांची विक्री सुरू असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याने रामदेव बाबा व त्यांच्या कंपनीला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर पतंजलीने जाहीर माफीनामा वृत्तपत्रातून प्रसिद्ध केला होता आणि ही चौक पुन्हा करणार नसल्याचे कोर्टाला सांगितले होते.
न्यायमूर्ती हेमा कोहली व न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाला याबाबत माहिती देताना कंपनीमार्फत सांगण्यात आले की सर्व फ्रेंचाईजी स्टोरना सदर उत्पादनांची विक्री थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ही औषधे परत मागवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे माध्यमांनाही या 14 औषधांच्या जाहिराती थांबविण्यास सांगण्यात आल्या आहेत.
दरम्यान खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी निश्चित केली आहे. ज्यामध्ये पतंजलीवर कोविड लसीकरण मोहीम आणि आधुनिक वैद्यकीय प्रणाली विरुद्ध प्रचार मोहीम चालविण्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने न्यायालयाला सांगितले होते की पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांचे उत्पादन परवाने त्वरित निलंबित करण्यात आले आहेत. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी योग गुरु रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण व पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना जाहीर करण्यात आलेल्या अवमान नोटीसी वरील आदेश सर्वोच्च न्यायालयाने 14 मे रोजी राखून ठेवला होता. आता पुढील सुनावणीत कोर्ट काय निर्णय देते याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.