Sangli Samachar

The Janshakti News

पवारांची पॉवर केवळ एका फोनवर आला दहा कोटींचा निधी !



| सांगली समाचार वृत्त |
उरळी कांचन- दि. १० जुलै २०२४
राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांना ओळखले जाते, तसेच तेल लावलेला पैलवान म्हणून ही ज्यांच्याबद्दल बोलले जाते, अनेक विवादास्पद निर्णयामुळे जे कायम चर्चेत असतात. विधानसभा असो वा लोकसभा त्यांच्या मर्यादित शक्तीवरून ज्यांना कायम टिकेच्या केंद्रस्थानी राहावे लागते, जे पाठीत खंजीर खूपसल्याच्या कारणावरून प्रसिद्ध पावले, सख्ख्या पुतण्याने अख्खी राष्ट्रवादी पळवल्यानंतरही ज्यांनी लोकसभेतील निवडणुकीत स्ट्राईक रेटमुळे अजूनही आपण संपलो नाही हे दाखवून दिले आहे. त्या शरद पवारांची पॉवर आजही कायम असल्याची घटना नुकतीच उरळी कांचन येथे घडली.

शरद पवार यांचे शत्रू आणि मित्र सर्वच राजकीय पक्षात आढळतात. परंतु शत्रूवर मात करीत मित्रांना जवळ करण्याचे कसब दाखवत आपल्याला हवे ते करवून घेण्यात शरद पवारांचा हात राजकारणात कोणीच धरु शकणार नाही असेही बोलले जाते. आणि अनेक घटनातून ते सिद्धही झाले आहे. 

उरळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या सत्तर वर्षे पुरातन असलेल्या एका विद्यालयाची इमारत मोडकळीस आली होती. त्याचे पुनरश जीवन करण्यासाठी, निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती संघाच्या संचालकांनी शरद पवार यांच्याकडे केली. आता शासनाकडून हा निधी उपलब्ध होईल की नाही ही शंका असल्याने शरद पवार यांनी पुण्यातील एका मोठ्या उद्योग समूहाकडे संपर्क केला आणि या समूहाने सीएसआर फंडातून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी सर्वोदय संघामध्ये जमा असलेला पाच कोटी रुपयांचा निधीही विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मंजूर करून घेतला. त्यामुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न कायमपणे मिटणार आहे.

हा निधी महिन्याभरात संस्थेला मिळणार असून येत्या 15 ऑगस्टला महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे विश्वस्त सचिव सोपान कांचन यांनी दिली. यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजाराम कांचन, देविदास बन्साळी, संभाजी कांचन, महादेव कांचन, राजेंद्र टिळेकर, मनोहर कांचन आधी उपस्थित होते.