| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. १९ जुलै २०२४
भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून २०१५ हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जाहीर केला. योगासंबधी माहिती, फोटो, योगागुरूंच्या मुलाखती यांचा टी.व्ही., इंटरनेट, रेडिओ, वर्तमानपत्रातून पूर वाहू लागला. या वातावरणाने भारून जाऊन योगाचे आचरण करण्याचे मी ठरविले. (ही माझी नेहमीची सवय. एखादी गोष्ट आवडली की माझा सुरवातीचा उत्साह नेहमी दुथडी भरून वाहत असतो.) लगेचच योगा पॅण्ट, शर्ट, मॅट खरेदी केले. योगा-सेंटरची एक महिन्याची फी भरली व दररोज पहाटे योगासेंटरवर कारने जाऊ लागलो.
एक महिना व योगा सेंटरची फी, दोन्ही संपुष्टात आले. मी घरच्या घरी दररोज सकाळी योगासने, प्राणायाम करू लागलो. कांही दिवस असेच गेले. नव्याचे नऊ दिवस व सुरवातीचा उत्साह संपला. या ना त्या कारणाने पहाटे उठणे मला जिकीरीचे वाटू लागले. उशीरा उठले की योगा करण्याचे राहून जाऊ लागले व कांही कालावधीने पूर्ण बंद झाले. (अरे कोण तो कुत्सीतपणे हसतोय मला?)
ते वर्ष असेच संपले. नवीन वर्ष सुरू झाले.
मुर्खांचा दिवस आला व गेला. योगाबद्द्ल परत एकवेळ प्रसारमाध्यमांना जाग येऊन, ती योगाचे महत्व प्रसृत करू लागली. आणि, एक दिवस अचानक माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा कुठुनतरी उद्भवला व म्हणाला,
“काय राजाभाऊ, कसा चालला आहे तुमचा योगाचा अभ्यास?”
कांही वेळापुर्वी ऐकु आलेल्या कुत्सितपणे हसण्याच्या आवाजामागील रहस्य मला उलगडले. मनातील ‘त्या’ कोप-याला कांही उत्तर न देता मी गप्प बसलो. पण, तो खट्ट कुठे गप्प बसतो.
“अरे, राजा, मागील वर्षी तू योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा करायला सुरूवात केली होतीस ना ? शिबीराची फी, योगा मॅट, पॅण्ट यावर चांगले नऊ-दहा हजार रुपये खर्च केलेस होतेस ना ? काय झाले त्याचे ? हे सर्व बासणात गुंडाळून योगासने, प्राणायाम करायचे बंद झाले ना ?”
मनातील कोप-याच्या प्रश्नाला मी नाईलाजाने होकारार्थी मान डोलावली. माझ्या वागण्याचे मी नेहमीप्रमाणे समर्थन करणार होतो इतक्यात, माझ्या मनातील ‘तो’ कोपरा पुढे बोलु लागलाः
“राजा, तू योगा करणे थांबवण्या मागील तुझी कारणे खरं तर सबबी, मला चांगल्या माहिती आहेत. तुला घरी-ऑफीसमध्ये खूप काम असते, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअप सारख्या इंटरनेट साईटसवरील उपयुक्त माहीती अभ्यासायची असते. दिवसाचा बराचसा वेळ प्रवासामध्ये खर्ची होतो. त्यामुळे योगा करायला वेळ मिळत नाही. हल्लीच्या वाढत्या महागाईत योगासेंटरची फी, जाण्यायेण्यासाठी पेट्रोल खर्च परवडत नाही. शिवाय सकाळी बाहेर थंडीही फार असते त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत,.... वगैरे, वगैरे.
पण राजा, योगा करण्याचे बंद करण्यामागील खरे कारण तुलाही आणि मलाही चांगले माहिती आहे. त्यामुळे त्यावर कांही भाष्य करून कशाला वेळ घालवायचा? त्या ऐवजी माझ्या मनातील प्रश्न रोखठोकपणे तुला विचारतोः राजा, योगा करण्यासारख्या चांगल्या कृती, सवयी, होकारार्थी विचार यांच्याकडे तुझा ओढा नेहमी कमी, पण वाईट, नकारार्थी, नैराश्य, अपायकारक कृती, सवयीकडेच जास्त कां बरं असतो?”
माझ्या मनातील ‘तो’ कोपरा आपल्या जागी तर परतला, परंतु जाताना माझ्या मनामध्ये अनुत्तरीत प्रश्नाचे काहूर उठवुन गेला.
मी विचार करू लागलो. एखादी गोष्ट, कृती अहितकारक, निषिद्ध आहे करू नका असे कानीकपाळी ओरडून जरी सांगितले तरी मी त्याकडेच कधी कुतूहलापोटी, कधी प्रसार-प्रचार माध्यमातील आकर्षक भुलविणा-या (कशाचे आकर्षण व कशाला भुलतो हे माझे मलाच ठाऊक असते) जाहिरातींना बळी पडून, कधी गैरसमजुतीपोटी तर, कधी योग्य ज्ञानाच्या अभावी आकर्षिला जातो. परिणाम असा होतो की अशा गोष्टींची, कृतीची, विचारांचे मनामध्ये आकर्षण निर्माण होते. कांही काळाने त्यांची चटक लागतो. लागलेल्या चटकेचे रूपांतर सवयीमध्ये व नंतर व्यसनामध्ये कधी बदलून जाते हे माझे मलाच समजत नाही. बरं, अशा वाईट सवयींचा, व्यसनांचा शेवट त्रास व दुःखामध्ये होणार आहे, होत आहे हे सगळ्ळ खरं तर, मला कळत पण वळत नाही, असे कां बरं होत असावे?
माझे मन हितकारक, चांगल्या कृत्याकडे कमी पण वाईट, अहितकारक कृत्याकडे कां बरं जास्त आकर्षिले जात असते? मी परतपरत त्याच त्याच चुका का बरं करत असतो?
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण