yuva MAharashtra बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ देत, मुख्यमंत्र्यांचे सपत्नीक महापुजेतून विठुरायाला साकडे !

बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ देत, मुख्यमंत्र्यांचे सपत्नीक महापुजेतून विठुरायाला साकडे !


| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १८ जुलै २०२४
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले आहे. सर्वजण भक्तीमध्ये भान हरपून गेलेल्या पार्श्वभूमीवर "माझ्या बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर !" असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या चरणी सपत्नीक महापूजा करीत असताना घातले.

महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचे महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत,व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खा. श्रीकांत शिंदे, आ. समाधान आवतडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी प्रसारमाध्यमासमोर बोलताना म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की, राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदींच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करीत आहे असे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील आषाढी वारीच्या तुलनेत यंदा पंचवीस ते तीस टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकत ठेवत असून, अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शासन कटिबद्ध आहे. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. वर्षानुवर्षे पंढरपूरातील विठुरायाच्या चरणी लीन होणाऱ्या वारकऱ्यांसाठी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारी निमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्येही तिपटीने वाढ केली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्व संमतीने तयार केला जात असून, त्याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.