yuva MAharashtra भ्रमाच्या भोव-यात फसलेले मांजर की मी ?

भ्रमाच्या भोव-यात फसलेले मांजर की मी ?


| सांगली समाचार वृत्त |
बेंगलुरु - दि. १ जुलै २०२४
इंटरनेटवर एक व्हिडीओ क्लिप मी पाहिली. प्रथम व्हिडीओ क्लिपमध्ये एक मांजर बसलेले दिसते. त्या मांजराच्या बाजुला एक आयपॅड ठेवलेला असतो. कांही वेळाने त्या आयपॅडवर एका उंदिराचे चित्र उमटते. आयपॅडवरील उंदिर (खरं म्हणजे उंदीराचे डिजीटल चित्र) मांजराच्या नजरेला पडते आणि मांजर त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार उंदीराला पकडण्यासाठी आयपॅडवर ज्या ठिकाणी उंदीर बसलेला दिसतो तिथे आपला पंजा मारते.

पंजा आपटत्या क्षणीच सॉफ्टवेअरच्या करामतीमुळे आयपॅडमधील तो डिजीटल उंदीर आपली जागा सोडून पळतो व आयपॅडवर दुस-या ठिकाणी उमटतो. आपल्या पंजातून उंदीर निसटला हे मांजराला समजते. आणि आयपॅडवर ज्या ठिकाणी उंदीर परत बसलेला दिसतो तिथे मांजर आपला पंजा परत एक वेळ मारते आणि परत एक वेळ उंदीर निसटतो. मांजर परत-परत आयपॅडवर पंजा मारत राहते आणि प्रत्येकवेळी सॉफ्टवेअरच्या करामतीमुळे डिजीटल उंदीर मांजराच्या पंजातून निसटून इकडे-तिकडे पळत राहतो. आयपॅडमधील डिजीटल उंदीर व ख-या मांजराचा हा खेळ व्हिडीओ क्लिपमध्ये असाच पुढे चालू राहतो.

आयपॅडवरील उंदीर व मांजराची ती व्हिडीओ क्लिप पाहतांना मला खुप गंमत वाटत होती. आणि मी हसत होतो. मी असा खुदुखुदु हसत असतांना माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा समोर उभा ठाकला आणि म्हणाला,

“राजा, इतका कुणाला हसत आहेस? खोटा उंदीर मिळवण्याचा विफल प्रयत्न करणा-या मांजराला?”


“नाहीतर, आणखी कुणाला ? त्या बुद्दु मांजराला आणि त्याच्या फसगतीला मी हासत आहे.”

हसतच मनातील ‘त्या’ कोप-याला मी उत्तर दिले.
“असं कां ? त्या मुर्ख मांजरांची फसगत पाहुन तुला गंमत वाटते, हसु येते पण तुझीही स्थिती त्या मांजरासारखीच नाही कां?” माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने मला डिवचले.

“काय म्हणायचे आहे तुला? मी बुद्दु आहे? मूर्ख आहे ? खोट्या, भ्रामक वस्तूंच्या मागे लागतो ? स्वतःची वारंवार होणारी फसगत मला समजत नाही ? अरे, कांहीतरीच काय बरळतोस.

आयपॅडमधील उंदीराच्या चित्राला खरे समजून त्याला पकडण्यासाठी वारंवार फोल प्रयत्न करणारे ते मुर्ख मांजर कुठे आणि मी कुठे. कहाँ राजा भोज और कहाँ गंगु तेली. माझी बुद्धी, माझ्या जवळील पैसा, अडका, संपत्ती, समाजातील माझे स्थान, मला मिळत असलेला मानसन्मान, कशाची, कांहीतरी, कुठेतरी तुलना करता होऊ शकते कां? की आपले नेहमीप्रमाणे कांही तरी बरळायचे म्हणून बरळतोस? शेवटी किती केले मांजर एक प्राणी आणि मी, प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेला एक मनुष्य, तुलना होऊच शकत नाही.”


नकळत मनातील कोप-याशी मी दंद्वाचा पवित्रा घेतला.

“राजा, मला काय सूचित करायचे आहे ते समजून घे. त्या मांजराला आयपॅडमधील डिजीटल उंदीर खरा वाटला, कारण मांजरासारख्या प्राण्याला परमेश्वराने मानवप्राण्यापेक्षा कमी बुद्धी प्रदान केली आहे. त्यामुळे खरे-खोटे, सत्य-भ्रम, यात भेदाभेद करण्याची समज प्राण्यांना नसते. त्यामुळे खोट्या, भ्रामक वस्तुंना खरे समजून ते त्यांच्या मागे लागतात. पण, .... त्या जगन्नायकांने तुला, खरे-खोटे, सत्य-असत्य, वास्तव-भ्रम, उचित-अनुचित, योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यात फरक करण्याची बुद्धी दिली आहे. तरीही तू पैसा, संपत्ती, मान-सन्मान, जे आळवावरच्या पाण्यासारखे क्षणिक आहे, भ्रामक आहे हे समजुनही त्यांच्या मागे लागत नाहीस कां?

त्यांच्या प्राप्तीसाठी अनेक उपद्व्याप, खटाटोपी, लांड्या-लबाड्या करत नाहीस कां ? काम, क्रोध, मोह, मद, लोभ, मत्सर हे तुझे शत्रु आहेत हे जाणुनही त्यांच्या आहारी तू जात असतोसच ना? पुर्वदुषित ग्रह, नैराश्य, नकारार्थी विचार, यशाच्या मार्गातील अडथळे आहेत हे माहिती असूनही त्यांचा अंगिकार करत असतोस ना? 

अरे मूढा, क्षणिक, वस्तु, क्रीया, कर्म, व्यवहार यांच्यामध्ये सुख-समाधान शोधता-शोधता, तूझे खरे सुख तूझ्या हातून कधीच निसटून गेले आहे ही सत्य स्थिती तूला कशी समजत नाही? राजा, आणखी किती काळ असा तू भ्रमात राहणार आहेस?” प्रश्नांचा भडिमार करून मनातील ‘तो’ कोपरा अंतर्धान पावला, पण जातांना माझ्या विचारांना चालना देऊन गेला. 

मी विचार करू लागलो. ‘खरचं, आजवर मी पैसा, घरदार, संपत्ती, पद, मान-सन्मान... जे क्षणिक आहे त्यांच्या मागे लागलो. षड्रीपु, पुर्वदुषित ग्रह, नकारार्थी विचार, नैराश्य यांच्या आहारी गेलो. क्षणिक, खोट्या सुखाला भ्रमाने खरे मानले, त्याच्या मागे लागलो आणि ख-या सुखा-समाधानाला मात्र मुकलो.’ वास्तवतेची मला जाणीव झाली. माझ्या मनात प्रश्नांचा ज्वालामुखी उठला, 

‘काय केले असता मला या भ्रमाच्या भोव-यातून मुक्त होता येईल? भ्रमातून सुटका होऊन, सत्य जाणून ज्ञानाकडे माझी कशी वाटचाल होईल? काय केले असता खरे सुख जे माझ्या हातातून निसटले आहे ते मला परत गवसेल? की माझी अवस्था त्या डिजीटल उंदराच्या मागे लागणा-या भ्रमाच्या भोव-यात सापडलेल्या मांजरासारखी अशीच चालू राहिल?’

- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण