| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जुलै २०२४
शेतकऱ्यांना उध्वस्त करणा-या शक्तीपीठ महामार्गावरून सध्या वातावरण तप्त आहे. हा महामार्ग रद्द व्हावा म्हणून नांदेड पासून कोल्हापूर पर्यंत शेतकऱ्यांनी या विरोधात एल्गार पुकारलेला आहे. याबाबत अनेक आंदोलने करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थगित ठेवणे भाग पडले.
परंतु शक्तीपीठ महामार्ग स्थगित नव्हे तर रद्दच करावा अशी मागणी शेतकऱ्या मार्फत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे तासगाव तालुक्यातील कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आले होते. यावेळी शक्तीपीठ शेती बचाव कृती समितीच्या वतीने त्यांना हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, हा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्याबाबत बैठक घेऊ. यावेळी शेती बचाव कृती समितीचे नेते आणि किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, सतीश साखळकर, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, शेतकरी कामगार जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, उमेश एडके आदी उपस्थित होते.
शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू मांडताना उमेश देशमुख यांनी म्हटले आहे की, शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यातील 19 गावातील हजारो शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, अशी हजारो शेतकऱ्यांची मागणी आहे.
शक्तिपीठ शेती बचाव कृती समितीची बाजू ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला व शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन निर्णय घ्यावा अशी सूचना केली. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर लगेच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.