Sangli Samachar

The Janshakti News

प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पथकात होत्या फक्त महिला पोलीस, काय आहे कारण ?



| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. १ जून २०२४
कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा (वय ३३) याला बेंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी विमानतळावरच अटक केली. विशेष म्हणजे त्याला अटक करणाऱ्या टीममध्ये सर्व महिला पोलिसांचा समावेश होता. केवळ महिला पोलिसांचीच नियुक्ती यासाठी का करण्यात आली असावी, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच प्रज्वल रेवण्णा याच्याशी संबंधित स्कँडल उजेडात आलं. रेवण्णा हा देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुतण्या व हसन मतदारसंघाचे उमेदवार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यासाठी मतं मागितल्यानं हे प्रकरण देशभर पोहोचलं. 

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं तात्काळ याची दखल घेऊन प्रज्वल रेवण्णा याच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मात्र, प्रत्यक्ष कारवाई होण्याआधीच रेवण्णा भारताबाहेर गेला. देवेगौडा कुटुंबीयांनी कानपिचक्या दिल्यानंतर व सीबीआयनं रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर रेवण्णा याला परतण्याशिवाय पर्याय नव्हता. जर्मनीहून परत येताच पोलिसांनी त्याला विमानतळावरच अटक केली.


रेवन्ना गुरुवारी रात्री उशिरा बंगळुरू विमानतळावर उतरला, तेव्हा महिला पोलिसांची एक टीम त्याच्या अटकेसाठी तिथं हजर होती. या पथकाचं नेतृत्व सुमन डी पेणेकर आणि सीमा लाटकर या दोन आयपीएस अधिकारी करत होत्या. यानंतर प्रज्वलला जीपमधून सीआयडी कार्यालयात नेण्यात आलं.

महिला पोलिसांचंच पथक का?

जीपमध्ये फक्त महिला पोलीस होत्या. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वलला अटक करण्यासाठी सर्व महिला अधिकाऱ्यांना पाठवण्याचं पाऊल जाणीवपूर्वक उचलण्यात आलं होतं. रेवण्णा यांने खासदार म्हणून आपल्या पदाचा आणि अधिकाराचा महिलांच्या विरुद्ध गैरवापर केला. त्यामुळं महिलांनीच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं हे समर्पक ठरलं असतं. महिला अधिकारी कोणाला घाबरत नाहीत असा संदेशही या माध्यमातून पीडित महिलांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेवण्णा यांच्या अटकेसाठी महिलांचं पथक बनवलं होतं.