Sangli Samachar

The Janshakti News

निवडणूक निकालापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडर स्वस्त !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ जून २०२४
महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी १ जून रोजी सिलिंडरच्या नव्या किंमती अपडेट्स केल्या आहेत. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या शेवटच्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी म्हणजेच १ मे रोजी मतदान होत आहे. त्यानंतर संध्याकाळी देशात एक्झिट पोलची आकडेवारी सादर केली जाईल. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, या निकालाआधी गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.


व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त

IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानंतर दोन्ही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती अनुक्रमे १६७६ आणि १६२९ रुपये झाल्या आहेत.

कोलकातामध्ये सिलिंडरच्या दरात ७२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचा दर १७८७ रुपयांवर पोहचला आहे. दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचे शहर समजल्या जाणाऱ्या चेन्नई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ७० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरची किंमत १८४०.५० रुपयांवर आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. ९ मार्च घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यावेळी एलपीजीच्या किमतीत तब्बल १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये इतकी झाली. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा ८२९ रुपये, चेन्नईत ८१८.५० रुपये इतका आहे.