Sangli Samachar

The Janshakti News

रिक्षा चालक मालकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार - पृथ्वीराज पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जून २०२४
सरकारने प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रत्येक दिवसाला ५० रुपये विलंब शुल्क लागू केले आहे. त्यासंदर्भात येथे जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी धारकांची बैठक झाली. त्यात रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील, अजित पाटील, साजिद अत्तार, सलीम कुरणे, रमेश सावंत, करण तोरगळे, किरण कुरकुटे (विटा), खानापूरचे हणमंत मंडले, सलीम तांबोळी, वसंत इंगळे, अजित लोंढे, विलास जाधव (कवठेमहांकाळ), शंकर वालकर (आष्टा), सतीश खुळे पाटील, अभिजित माने (जत), मिथुन कदम (आटपाडी), टॅक्सी संघटनेचे मल्लिकार्जुन मजगे आदी उपस्थित होते.


रामभाऊ पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेल्या लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सदरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी विनंती करणार आहे. १५ तारखेपासून केंद्र व महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून रिक्षा, टॅक्सी यांना काळे झेंडे लावून व्यवसाय करणार आहोत. तसेच रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई लढण्याचा एकमताने बैठकीत ठराव करण्यात आला. पृथ्वीराज पाटील म्हणाले, खासदार विशाल पाटील, आ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत यांच्यासह चर्चा करून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.

समाजातील प्रश्नावर सातत्याने आवाज उठवण्यात येत असल्यामुळे व आंदोलन करण्यात येत असल्यामुळे पृथ्वीराज पाटील यांची समाजात सर्वमान्य नेता अशी प्रतिमा निर्माण होत आहे. याचा आगामी सांगली विधानसभा निवडणुकीत चांगलाच फायदा होणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे .