| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जून २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागला. महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेले विशाल पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा एक लाखांच्या मताने पराभव केला. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना चितपट केले.
विशाल पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्याच रॅलीत काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, काही आमदार उपस्थित होते. एकंदरीतच ठरलेला नेम, सांगलीतील नेत्यांचा 'गेम' करून गेला असेच चित्र म्हणावे लागेल. कारण विशाल पाटील यांच्या विजयी रॅलीतील एक पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. पोस्टर नेमकं कोणासाठी होतं त्याची चर्चा आता सांगली जिल्ह्यात सुरू आहे.
सांगली लोकसभा निवडणूक यंदा राज्यात गाजली. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केला. यावरून सांगली काँग्रेसमध्ये सुरू झालेलं रणकंदन अखेर विजयी पताका घेऊन थांबलं. मात्र निवडणूक लागल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला.
गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी लोकसभेची तयारी ठेवली होती. त्यातच कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेऊन सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे दिल्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीवरील हक्क सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची होती. सांगलीचे काँग्रेसने ते आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत यांच्यासह अनेकांनी विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यावर केंद्रीय पातळीवर दबाव ठेवला.
मात्र हा दबाव जुगारून विकास आघाडीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीतील एका नेत्यांनीच खोडा घातल्याचे उघड उघड काँग्रेस नेत्यांनी जाहीर केले होते. त्या झारीतील शुक्राचार्यचा आम्ही शोध घेऊच, असा इशारा देखील विश्वजीत कदम यांनी कोल्हापुरातून दिला होता.
विशाल पाटील यांचा विजय झाल्यानंतर सांगलीतून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजय मिरवणुकीत एका कार्यकर्त्यांनी इस्लामपूर 42 किलोमीटर असा फलक जय रॅलीत नाचवला होता. हा पोस्टर नेमका कोणासाठी होता याची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात जोरात सुरू आहे. सांगलीचे नेतृत्व आपण ठरवतो असं समज करून घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याला या पोस्टर मधून उत्तर दिले गेले याची चर्चा कालच्या मिरवणूक स्थळी होती. सांगलीचा नेतृत्व ठरवणाऱ्या नेत्यांनी सांगलीतून इस्लामपूर 42 किलोमीटर आहे असे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे.