Sangli Samachar

The Janshakti News

नेमकं जगावं कसं ? तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं... !
नेमकं जगावं कसं ? तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं... !

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही....!

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत... आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं....,!

"पुढे चला... पुढे सरका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...

पण कुणावर विशेष लोभ नाही...

कोणावर राग तर मुळीच नाही...
कुणाचा द्वेष नाही...
कुणाचा तिरस्कार नाही...
आपला संबंध फक्त तिकिटापुरता... !

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही...
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही...
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं...
येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...

मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते....
प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं ....
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....
पण त्या गावात अडकायचं नाही....
आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या "ठेसनावर" जायचं....

"शिंगल" बेल मारली की थांबायचं... "डबल" मारली की निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....
आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!

हा शेवटचा स्टॉप आहे....समद्यानी उतरून घ्या... असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की "आपल्या घरी" निघून जायचं.... !

उद्या कुठे जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल.... ? हे ठरवणारा वेगळा असतो...

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही... ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही...

शाश्वत एकच आहे... तो म्हणजे प्रवास...!

आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही... प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... प्रवास सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!