Sangli Samachar

The Janshakti News

देवेंद्र फडणवीसांची 'आरएसएस'च्या नेत्यांशी 'गुफ्तगु' !



| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. ७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुरुवारी नागपूरमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत नेमके काय ठरले, हे गुलदस्त्यात असले तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे यानंतर देवेंद्र फडणीस थेट दिल्लीला रवाना झाले असल्याने वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. फक्त नऊ उमेदवार निवडून आले. त्यातही विदर्भात दोनच खासदार शिल्लक राहिले आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी सत्तेतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, निवडणुकीच्या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संघाची आता भाजपला गरज राहिली नसल्याचे मत व्यक्त केले होते. या वक्तव्याने स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. सध्या भाजपला मिळालेल्या जागा लक्षात घेता संघाशिवाय विजय अवघड असल्याची जाणीव भाजपच्या नेत्यांना झाली असावी. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस आणि संघाच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याने संघटनेत मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहे.

सध्या नागपूरमध्ये संघाचा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. देशभरातील स्वयंसेवक यात सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध राज्यातून पदाधिकारी आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे संघाचे पदाधिकारी स्थानिक नव्हते. त्यामुळे त्यांची नावे कोणालाच कळू शकले नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही याची माहिती नाही. संघाच्या पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरी त्यांची भेट घेतली. फडणवीस आणि संघाचे पदाधिकारी याशिवाय या दरम्यान कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे याचा तपशील कोणालाच कळू शकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला होता.