Sangli Samachar

The Janshakti News

मिरजेत बनावट नोटांचा कारखाना, ५० रूपयांच्या एक लाख ९० हजाराच्या नोटा जप्त; एकास अटक !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जून २०२४
मिरजेत बनावट नोटांचा छोटा कारखाना काढून चक्क ५० रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या अहद महंमद अली शेख (वय ४४, रा. शनिवार पेठ, गणपती मंदिरजवळ, मिरज) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली.त्याच्याकडून एक लाख ९० हजार रूपयांच्या बनावट नोटा, छपाई मशिनरी, साहित्य असा ३ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक दि. ७ रोजी पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संतोष गळवे, गौतम कांबळे यांना आकाशवाणी केंद्राजवळ एकजण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 


सहायक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक महादेव मोरे यांची दोन पथके परिसरात पाहणी करण्यास गेली. तेव्हा आकाशवाणी केंद्राजवळ संशयित अहद शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात ५० रूपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या ७५ नोटा जप्त केल्या. पोलिसांनी नोटांची निरखून तपासणी केली असता सर्व नोटांचा कागद खऱ्या नोटांपेक्षा वेगळा दिसणारा आढळला. छपाईचा रंग आणि एकाच सिरीजच्या व एकाच नंबरच्या नोटा मिळून आल्या. त्याच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरजेत घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा मारला. बनावट नोटा छपाईसाठीचे मशिन, कागद, वेगवेगळ्या रंगाची शाई, लॅमिनेटर मशीन, लाकडी स्क्रीन प्रिटिंग ट्रे, लाकडी पेपर अलाईमेंट पेटी, कटर मशिन, कटर, हेअर ड्राय मशिन, पट्टी, लॅमिनेशन व रंगीत कागद असे साहित्य जप्त केले. तसेच ५० रूपये दराच्या शंभर नोटांचे ३८ बंडल, अर्धवट छापलेली बंडले, मोबाईल असा एकुण ३ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अहद शेख याला अटक केली असून त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक निरीक्षक गोडे, उपनिरीक्षक पोवार, अंमलदार संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, विनायक शिंदे, मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, तपस्या खोत, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता

मिरजेत यापूर्वी बनावट नोटांची प्रकरणे उघडकीस आली आहे. मिरजेतून अहद शेख हा बनावट नोटा शेजारील कर्नाटक राज्यात वितरीत करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी व्यक्त केली.

१०, २० च्या नोटा छापण्याचा प्रयत्न

अहद शेख याच्याकडे दहा आणि वीस रूपयाच्या बनावट नोटांचे नमुने मिळाले आहेत. तो दहा, वीस रूपयाच्या बनावट नोटा देखील छापणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

एक वर्षापासून उद्योग

अहद शेख हा एक वर्षापासून बनावट नोटा छापण्याचा उद्योग करत होता. परंतू त्याच्या कुटुंबियांना तसेच मिरजेतील शेजारील लोकांना याची अजिबात माहिती नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

७० रूपयाला शंभर रूपये

भारतीय चलनातील खऱ्या ७० रूपयाच्या बदल्यात तो बनावट ५० च्या दोन नोटा देत होता. ७० च्या बदल्यात बनावट शंभर रूपये असे त्याचे प्रमाण होते. एजंटामार्फत तो बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.

वॉटरमार्कही बनवला

पन्नास रूपयांच्या बनावट नोटेच्या डाव्या बाजूला महात्मा गांधींजींची प्रतिमा असलेला वॉटरमार्कही शेख याने बनवला होता. तसेच चांदीची तार नोटेत दिसावी यासाठी तो प्रयोग करत होता. बारावी पास अहद याच्याकडे छपाईच्या जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती आहे.