| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २३ जून २०२४
महाआघाडीतून डावल्यामुळे बंडखोरी करीत लोकसभेचा दरवाजा फोडून संसदेत पोहोचलेल्या विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी आपल्या विजयात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचा पैरा फेडण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठीचा एल्गार त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून केला. खासदार झाल्याबद्दल मिरजकरांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातून स्व. वसंतदादांच्या विचारांचे चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना खा. विशाल दादा म्हणाले की मिरज व मिरज तालुक्यातील जनता मोठ्या मनाची आहे. त्यांनी बाहेरील व्यक्तीला स्वीकारून विधानसभेला संधी दिली. परंतु याच बाहेरच्या व्यक्तीने घरातील व्यक्तीला बाहेर काढण्याचे षडयंत्र रचले. प्रसंगी पोलीस बळाचा वापर केला. परंतु मिरज तालुक्यातील स्वाभिमानी आहे. केवळ पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही. जनतेने कारस्थान ओळखले आणि लोकसभेला 25 हजाराचे लीड देऊन आपला घरातील उमेदवार निवडून दिला व हे षडयंत्र हाणून पाडले, असे विशाल पाटील यांनी सांगताच उपस्थितातून टाळ्यांचा गजर झाला.
आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत तेव्हाही येथील जनतेने काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करीत खा. विशाल पाटील यांनी, जिल्ह्यातून वसंतदादांच्या विचाराचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे, इतकेच नव्हे तर आमदार विश्वजीत कदम यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवायचे, अशी भीष्म प्रतिज्ञाच यावेळी केली.
आ. विश्वजीत कदम यांनी लोकसभेला ज्या पद्धतीने विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकत लावली ते सारेच जाणतात. आ. विश्वजीत कदम यांच्याप्रमाणेच जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी व पक्षाबाहेरीलही नेत्यांनी खा. विशाल पाटील यांना ताकद दिली. भविष्यात या साऱ्यांच्याच उपकाराची परतफेड आपण करू असा विश्वासही खा. विशाल पाटील यांनी यावेळी बोलून दाखविला.
खा. विशाल पाटील यांच्या सत्कारासाठी आ. विश्वजीत कदम, माजी मंत्री व कवठेमंकाळ तालुक्याचे नेते अजितराव घोरपडे सरकार, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, सांगली महापालिकेचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, जयश्रीताई पाटील, मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब कोरे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, सी. आर सांगलीकर यांच्यासह मिरज तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.