| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जून २०२४
देशातील पहिली वैमानिक तयार करण्याची शाळा अर्थात ' पायलट स्कूल' उभारण्याचा मान अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे. एअर इंडिया या नामांकित कंपनीने याबाबत घोषणा केली असून, वर्षाला या स्कूलमध्ये 180 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विमान उड्डाणाचा कोणताही अनुभव नसलेले उमेदवार यासाठी निवडण्यात येणार आहेत. 'विमान वाहतूक उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना संधी' हे यामागील एअर इंडियाचे उद्दिष्ट आहे.
भारतात व भारताबाहेर वैमानिक क्षेत्रात मोठी मागणी लक्षात घेऊन एअर इंडियाने हे पाऊल उचलले असून, भारतातील मनुष्यबळ, व धाडसी व्यक्तिमत्व याचा कंपनीने विचार करण्यात केला आहे. त्यानुसार अमरावतीमध्ये प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर एयर इंडियाच्या कॉकपीटचा मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना मोठी संधी निर्माण होणार आहे.
असा आहे प्रशिक्षण प्रोग्रॅम
याबाबत माहिती देताना एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशिक्षणामध्ये प्रारंभिक तसेच उच्च व व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे. येथे अत्याधुनिक आणि प्रगत विमान वाहतूक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार उच्च दर्जाचे फ्लाईंग सिम्युलेटर व विमान सेवेची इतर संबंधित उपकरणांचा समावेश असेल.
प्रवेश प्रक्रिया कशी असणार ?
सध्या भारतातील 40% पेक्षा अधिक विद्यार्थी पायलट क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी परदेशाची निवड करतात. यासाठी जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च येतो. परंतु देशातच असे उच्च दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले, तर खर्चात मोठी बचत होऊन अधिकाधिक भारतीय तरुणांना ही संधी मिळू शकते. मात्र यासाठी निवड प्रक्रिया मात्र कठीण असणार आहे. शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता यानुसार तरुण-तरुणींची निवड होणार आहे. परंतु हे 'पायलट स्कूल' कधीपासून सुरू होणार ? याचा मुहूर्त मात्र अद्याप ठरलेला नाही.