Sangli Samachar

The Janshakti News

प्रवासी बॅगेवरुन शिराळ्यातील खूनाचे गूढ उकलले, तिघांना अटक



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जून २०२४

शिराळ्यात आढळलेल्या बेवारस खूनाचे गूढ केवळ प्रवासी बॅगेवरून उकलण्यात सांगली पोलीसांना यश आले असून या खूनप्रकरणी मृताच्या पत्नी, मुलगीसह तिघांना पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.

खून झालेली व्यक्ती राजेश वसंतराव जाधव (वय ५३ रा.पलूस असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून त्याचा फेब्रुवारी २०२४ मध्ये नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून करून प्रेत प्रवासी बॅगेत ठेवून शिराळ्यात पूलाखाली टाकण्यात आले होते. या प्रकरणी मृताची पत्नी शोभा जाधव, मुलगी साक्षी जाधव (रा. पलूस) आणि नातेवाईक देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (वय २४ रा. शेवाळेवाडी, कराड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मृत जाधव हा कोणताही कामधंदा न करता दारू पिउन पत्नीवर संशय घेउन मारहाण करत होता. यामुळे या तिघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे अधिक्षक घुगे यांनी सांगितले.

शिराळ्यातील बाह्यवळण रस्त्यावरील पूलाखाली दि. २० मे रोजी दुर्गंधी सुटल्याने पाहणी केली असता सतरंजीत गुंडाळलेले सडलेली मानवी प्रेत प्रवासी बॅगमध्ये आढळले होते. प्रेत पूर्णपणे कुजलेले असल्याने स्त्री की पुरूष याचीही ओळख करता येत नव्हती. केवळ प्रेत ठेवलेल्या प्रवासी बॅगेवरून पोलीसांनी संशयितांचा माग काढला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी प्रवासी बॅग तयार करणार्‍याकडे चौकशी केली. यावेळी पलूसमध्ये अशी बॅग दिल्याचे समजल्यानंतर बॅग विक्रेत्याकडे चौकशी केली असता शेवाळे यांने बॅग नेल्याचे समजले. यावरून चौकशी केली असता पोलीसांना या खूनाचा छडा लावण्यात यश आले. मृताची कोणतीही ओळख पटत नसताना पोलीसांनी आव्हान स्वीकारून पाच वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून या खूनाची उकल केवळ दहा दिवसात केली असून या पथकातील सर्व सहभागी पोलीस कर्मचार्‍यांना बक्षिस जाहीर करण्यात येत असल्याचे अधिक्षक घुगे यांनी सांगितले. उप अधिक्षक मंगेश चव्हाण व सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सतीश शिंदे, शिराळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सिध्देश्‍वर जंगम यांच्या पथकांनी या खूनाची उकल केली.