Sangli Samachar

The Janshakti News

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या भागीदारीतील अनधिकृत पंचतारांकीत हॉटेल सील !| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. २ जून २०२४
पाचगणी येथील रहिवासी वापराच्या इमारतीत अनधिकृत व अतिरिक्त बांधकाम करून पंचतारांकित बांधकाम केलेले पंचतारांकित हॉटेल फर्नवर पोलीस बंदोबस्तात आज शुक्रवारी कारवाई करत सातारा प्रशासनाने व पाचगणी गिरीस्थान पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आज गुरुवारी दुपारी सील केले. 

१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटामधील आरोपी समीर शिंगोरा यांची भागीदारी अस्लेले हे हॉटेल आहे. नऊ वर्षे शिक्षा भोगून ते बाहेर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, पाचगणी गिरीस्थान पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पाचगणी पालिकेचे कर्मचारी व मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे हॉटेल सील करण्यात आले.

सध्या महाबळेश्वर पाचगणी येथे पर्यटन हंगाम जोरात असून हे संपूर्ण हॉटेल पर्यटकांनी आरक्षित केलेले होते. हॉटेल सील करतेवेळी काही पर्यटक हॉटेलमध्ये होते तर काही पर्यटनावर बाहेर गेले होते. या सर्वांना बोलावून घेऊन हॉटेल खाली करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर हॉटेलमधील ४३ खोल्या व हॉटेलची मुख्य इमारत सील करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच साताऱ्यातील गावी आलेले होते. यावेळी त्यांनी अनधिकृत बांधकामांवर ताबडतोबीने कारवाई करा असा आदेश सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिला होता. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल सील करण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे आज हॉटेल सील करण्यात आले.


हे हॉटेल अनधिकृत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पंचतारांकित हॉटेलच्या उताऱ्यावर रहिवास क्षेत्र असा उल्लेख आहे आहे. तरीही त्या जागेचा वाणिज्यिक वापर सुरू होता. अनधिकृतरित्या वापर बदलून अतिरिक्त बांधकाम करून ४३ खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने वापर बदलून वाणिज्यिक वापर व व्यावसायिक परवाना घेऊन घ्यावा असे आदेश दिलेले होते. मात्र असा कोणताही परवाना घेण्यात आला नाही. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी हे हॉटेल बंद करण्यात यावे अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र दांडगाईने हॉटेलचे बांधकाम व हॉटेल सुरू होते. अनधिकृत व अतिरिक्त बांधकाम काढून घ्यावे अशा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र यानंतर काहीही कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सातारा जिल्हा प्रशासनाकडून हे हॉटेल सील करण्यात आले.

अनेक वेळा संबंधित मालकाला नोटीस देण्यात आली होती. परंतु तरीही याचा व्यावसायिक वापर हा चालू होता. सदरील हॉटेल हे अनधिकृत असून मुंबई उच्च न्यायालयाने व्यावसायिक वापरासाठी परवानगी घेण्यास सांगितले होते. तरीही न्यायालयाच्या व शासनाच्या आदेशाबाबत कोणतीही कार्यवाही न करता व्यावसायिक वापर सुरू ठेवला होता. त्यामुळे संबंधितांना २४ तासांची अंतिम नोटीस देऊन व्यवसाय सुरूच राहिल्याने आज हॉटेल सील करण्यात आले आहे.

- निखिल जाधव 
प्रशासक तथा मुख्याधिकारी, 
पाचगणी गिरीसस्थान पालिका