Sangli Samachar

The Janshakti News

या शिवमंदिरात शिव-पार्वतीचा विवाह केला जात नाही! काय आहे कारण ?



| सांगली समाचार वृत्त |
चेन्नई - दि. ११ जून २०२४
तामिळनाडूला देवांची भूमी म्हणून ओळखले जाते मात्र जिथे सर्व शिवमंदिरात शिव-पार्वतीचा विवाह उत्साहात साजरा केला जातो तिथे या मंदिरात असे काहीही केले जात नाही. या मंदिरातील पुजारीही महिलांचे कपडे घालून पूजा करतात. असे का केले जाते, वाचा सविस्तर आणि या मंदिराला एकदा तरी नक्की भेट देऊन पहा.

भारतात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील एक म्हणजे मंदिर. भारतात अनेक वेगवेगळी मंदिरे पाहायला मिळतात तसेच प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी कथा असते. भारतातील प्रत्येक मंदिराचे स्वतःचे असे आध्यात्मिक महत्त्व असते. आज आम्ही तुम्हाला ज्या मंदिराविषयी सांगत आहोत त्या मंदिराचेही काहीसे असेच आहे. या मंदिराशी संबंधित अनेक तथ्य आहेत, जे लोकांना आकर्षित करतात. त्यातलाच एक म्हणजे या मंदिरात भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह केला जात नाही. तर इथले पुजारी महिलांचे वस्त्र घालून देवीची पूजा करतात. इथे असे का केले जाते? यामागच्या पौराणिक कथेनुसार जाणून घेऊयात.


या मंदिराला नक्की भेट द्या

भारतातील तामिळनाडू या राज्याला देवांची भूमी म्हणून ओळखले जाते. हे असे एक राज्य आहे, जिथे अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराला आध्यात्मिक महत्त्व आहे. येथील मंदिरांचे सौंदर्य तुमच्या मनाला मोहून टाकेल. या मंदिरांपैकीच एक आहे तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिर. 7व्या शतकात बांधण्यात आलेले हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे मंदिर देशातील भव्य मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. तसेच तामिळनाडूतील प्रसिद्ध मंदिरांच्या यादीत या मंदिराचे महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की हे मंदिर हिंदू चोल वंशाचा राजा कोकेनगानन याने बांधले होते. या मंदिराची आपली अशी चित्तथरारक गोष्ट आहे, जी ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच इथे जाण्याची इच्छा होईल.

मंदिरात शिव-पार्वती विवाह होत नाही ? काय आहे आख्यायिका ?

देशातील विविध मंदिरांमध्ये शिव-पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र जंबुकेश्वर मंदिरात असे काहीही केले जात नाही. यासंबंधित मंदिराची स्वतःची अशी वेगळी आख्यायिका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकदा भगवान शंकराने देवी पार्वतीला पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्यासाठी सांगितले होते. यावेळी देवी पार्वती अकिलंडेश्वरीच्या रूपात पृथ्वीवर अवतरली होती आणि यावेळी त्यांनी जंबूच्या जंगलात शंकराची मनोभावनेने पूजा केली होती. नंतर त्यांनी भगवान शिवाचे दर्शन घेऊन माता पार्वतीची तपश्चर्या पूर्ण झाली. येथे माता पार्वती शिष्याच्या रूपात आणि भगवान शिव गुरूच्या रूपात असल्याने त्यांचा विवाह इथे केला जात नाही. या मंदिरात दोघांच्या मुर्त्याही बाजूबाजूला न ठेवता एकमेकांसमोर बसवल्या जातात.

जंबुकेश्वर मंदिरसंबंधित एक रंजक समज अशीही आहे की, या मंदिरातील पुजारी हे पूजा करताना महिलांसारखे कपडे परिधान करतात. यामागचे कारण म्हणजे, या मंदिरात देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी तपश्चर्या केली होती, त्यामुळेच आजही या मंदिरात पुजाऱ्यांकडून महिलांचे कपडे घालून पूजा करण्याची परंपरा आहे.