Sangli Samachar

The Janshakti News

बोर्डात पहिला येण्याऐवजी विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या काठावर पास; प्रबळ विरोधकांसह मोदींना मिळाला सलग तिसऱ्यांदा सत्तेचा घास !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
हमखास मेरिटमध्ये येणार, बोर्डात पहिला येणार, अशी अधिमान्यता असणारा विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या काठावर पास होतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना ज्या निराशेने घेरले जाते, तशीच अवस्था आज मोदींच्या भाजपची झाली आहे. विजयाचा उन्माद आणि पराभवाचे शल्य दूर झाल्यानंतरचे चित्र मोदी ऐतिहासिक विजयाने तिसऱ्यांदा सत्तेवर परतत आहेत, पण प्रबळ विरोधकांसह, हेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले आहे !

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 मध्ये पूर्ण बहुमत मिळवून सत्तेची हॅटट्रिक केली होती. तशी सत्तेची हॅटट्रिक नरेंद्र मोदींनी देखील केली, पण मोदींचा तिसरा विजय मात्र भाजपसाठी पूर्ण बहुमताचा ठरला नाही. त्यांना आपल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या पाठिंब्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

तरी देखील मोदींचा हॅट्रिकचा विजय कमी मानण्यासारखा नाही. कारण मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेली मतांची टक्केवारी (241 जागा - 36.92%) ही 2019 पेक्षा थोडी सरसच राहिली आहे. मोदींच्या विजयातला निकष आणि फरक मात्र हा राहिला की मोदींनी अबकी बार 400 पार ही घोषणा देऊन भारताच्या जनतेची अपेक्षा उंचावली होती, पण त्या अपेक्षेबरहुकूम त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पूर्ण बहुमताचा विजय मिळवता आला नाही. मोदींच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300 आकडा गाठता आला नसला तरी 296 चा आकडा त्यांनी पार केला आहे त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमताचा लोकसभेत वांधा येणार नाही.


त्या उलट देशात काँग्रेसमुक्त राजकीय वातावरण तयार होऊ शकले नाही. उलट काँग्रेसचे राजकीय पुनरुज्जीवन करणारी निवडणूक असेच 2024 च्या निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. काँग्रेसला मिळालेली मतांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागा (98 जागा - 21.73 %) या काँग्रेस पक्षासाठी हौसला वाढविणाऱ्याच आहेत. त्यामुळे मोदी सत्तेवर परतले, ही जितकी ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे, तितकीच मोदी सत्तेवर परतताना आपल्या प्रबळ विरोधकांसह लोकसभेत बसणार आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे!!

2019 च्या पंचवार्षिकच्या अखेरच्या संसद अधिवेशनात पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये, देखो एक अकेला कितनोंपर भारी पड रहा है!!", असे म्हणाले होते. ते अनेकांना भारी पडले, हे खरे. परंतु ते जेवढे म्हणाले होते, तेवढे ते "भारी" पडू शकले नाहीत, हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले.

त्यापलीकडे जाऊन "इंडी" आघाडीतल्या नेत्यांनी जो विजयाचा उन्माद चालवला आहे, तो मुळात विजय आहे का ?, त्यांना मुळात बहुमत मिळाले आहे का ?, असा सवाल उपस्थित करणाराच निकाल लागला आहे. "इंडी" आघाडीचे सगळे मिळून बहुमत सगळा मिळून आकडा 230 आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेस सह "इंडी" आघाडीला विरोधकांचे सन्माननीय स्थान दिले आहे, असेच निकाल स्पष्ट सांगतो.

2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एवढा दारूण पराभव झाला होता, की त्यांना संख्याबळाच्या आधारे अधिकृतरित्या विरोधी पक्षनेता देखील नेमता आला नव्हता. 2024 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला ज्या 99 जागा मिळाल्या, त्या आधारे काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्ष नेता हक्काने अधिकृतरित्या नेमता येईल, एवढे काँग्रेसचे संख्याबळ जनतेने त्यांना बहाल केले आहे.

अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी 36, ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस 30, उद्धव ठाकरेंची शिवसेना 10, हे तीन प्रबळ प्रादेशिक पक्ष मोदींच्या विरोधात निवडून आले. शरद पवारांना त्यांच्या नेहमीच्या 10 पैकी 6 जागा मिळाल्या. त्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेनुसार आणि राजकीय अनुभवानुसार ते "इंडी" आघाडीत विशिष्ट स्थान राखून राहिले.

पण मुलींच्या भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेल्या तेलगू देशम 15, आणि जनता दर युनायटेड 14, यांनाही चांगलेच यश मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 पैकी 6 जागा मिळाल्या. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भोपळा फोडू शकली नाही.