Sangli Samachar

The Janshakti News

महेंद्र आप्पा लाड यांच्या खिशातील 'पाकीट' बघून आ. जयंत पाटील आ. डॉ. विश्वजीत कदम यांना म्हणाले...


सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. २४ जून २०२४
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला होता. निवडणूक संपल्यानंतरही हा वाद संपला नाही. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एकमेका विरोधात उडवलेली राळ हाही राज्यात चर्चेचा विषय बनलेली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त आ. जयंत पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी या दोन्ही नेत्यांकडून काही चटपटीत ऐकायला मिळेल अशी उपस्थितांचे अपेक्षा होती. परंतु आ. जयंत पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी एकमेकांबाबत स्तुती सुमने उधळल्याने उपस्थितांची चांगलीच निराशा झाली. परंतु याच दरम्यान आ. जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने उपस्थितांची करमणूक तर झालीच परंतु या बातमीचा व्हिडिओ सध्या राज्यभर गाजतो आहे.


या कार्यक्रमासाठी आ. जयंत पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्याप्रमाणेच उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांना उद्देशून, " खिशात काय आहे ?" असे म्हणत त्यांच्या खिशातून एक पाकीट काढले. महेंद्र आप्पा लाड यांच्या शर्टच्या खिशात कायम एक पाकीट असते. ज्यामध्ये स्वामी समर्थांचा फोटो असतो. लाड यांच्या खिशातील तो फोटो घेऊन डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे पाहत आ. जयंत पाटील म्हणाले की, "तुम्ही मागे असताना याची काय गरज आहे ?" या वाक्याने उपस्थितांमधून हास्याचे कारंजे उडाले.

लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विशाल पाटील यांना मिळालेले लिफाफा हे चिन्ह. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले डॉ. विश्वजीत कदम याचा संदर्भ आ. जयंत पाटील यांच्या वाक्यामागे असल्याने सध्या बातमीचा हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.