सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २४ जून २०२४
सांगलीचे विद्यमान खासदार विशाल दादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा अनेक कारणांनी गाजला. यापैकी एक कारण म्हणजे त्यांना मिळालेले 'लिफाफा' हे चिन्ह ! याच लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना "तुम्ही महाराष्ट्राचे वाघ असलात तरी आम्ही सांगलीचे वाघ आहोत !" असे आव्हान देत माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी डरकाळी फोडली होती. त्याची हे वाक्य संपूर्ण राज्यात गाजले होते.
या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या नुकत्याच मिरजकरांच्या वतीने करण्यात आलेल्या जाहीर सत्काराच्यावेळी किशोर दादा युवा मंचच्या वतीने खा. विशाल पाटील यांना चांदीच्या लिफाफ्याचे तर डॉ. विश्वजीत कदम यांना चांदीच्या वाघाचे स्मृती चिन्ह देऊन आगळावेगळा सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या निमित्ताने खा. विशाल पाटील यांनी डॉ. विश्वजीत कदम यांना मुख्यमंत्री करण्याचा मनोदय बोलून दाखवला. तर याचवेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांनी व्यक्त केलेल्या मनोदयाचा धागा पकडत भविष्यात सांगलीचा मुख्यमंत्री होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल परंतु आगामी सरकार हे महाआघाडीचेच असेल आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असे सांगत खा. विशाल पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला.
सध्या खा. विशाल पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम यांच्या या वक्तव्याबरोबरच त्यांना मिळालेल्या स्मृती चिन्हाची चर्चा सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होताना दिसत आहे.