Sangli Samachar

The Janshakti News

वेळ संपली तरी चंद्रहार पाटलांकडून मतमोजणी दरम्यान प्रतिनिधीच नाही ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२४
मतमोजणी प्रकियेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून अद्याप मतमोजणी दरम्यान प्रतिनिधीच दिले नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणीच्या 104 टेबलसाठी प्रतिनिधी द्यायचे होते. मात्र, दिलेल्या वेळेत चंद्रहार पाटलांच्या प्रतिनिधींची यादी शासनाकडे पोहोचलीच नाही. मुदत संपूनही प्रतिनिधी का दिले नाहीत याची माहिती मिळू शकली नाही.

चंद्रहार पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यता

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. सांगलीत तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून पुन्हा संजयकाका पाटील हे तर काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या 4 जूनला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी मतमोजणी दरम्यान प्रतिनिधी देणं गरजेचे असते. ते प्रतिनिधी अद्याप चंद्रहार पाटील यांनी दिले नाही. याची मुदत देखील संपली आहे. आज चंद्रहार पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रतिनिधी घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. 

तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी ?

सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासून हा मतदारसंघ चर्चेत होता. शेवटी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील  आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या दोन उमेदवारांमध्येच आता खरी लढाई असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकर्त्यामध्ये पैजे लागल्याची एक पोस्ट सोशल मिडियावर तूफान वायरल होते आहे. या मतदारसंघातून काँग्रसचे नेते विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, ही जागा शिवसेना "ठाकरे गटाला सोडण्यात आली. चंद्रहार पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. त्याबदल्यात सांगलीची जागा शिवसेना सोडल्याचे सांगण्यात आले. मात्र, यानंतर सांगली काँग्रेसमध्यो मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघातून विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते. सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीवारी देखील केली होती. मात्र, अखेर उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्यानं सांगली काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळाली.