Sangli Samachar

The Janshakti News

केंद्रातील भाजपचे 'घर' फिरले आता निर्णयाचे 'वासे'ही फिरणार का ?



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ७ जून २०२४
‘घर फिरले की घराचे वासेदेखील फिरतात’ याचा प्रत्यक्ष अनुभव आता भाजपला येण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या जागी NDA ला जनतेनं कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच सरकार बनण्याआधीच नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ पहिल्या दोनपेक्षा खूप वेगळा असेल हे दिसायला सुरुवात झाली आहे.

कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदा बरोबरच केंद्रातील महत्त्वाची खाती, लोकसभेचे अध्यक्षपद आणि गतकाळातील काही वादग्रस्त निर्णयावर भाजपला पाणी सोडावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. चंद्राबाबूंनी महत्त्वाच्या खात्याबरोबरच लोकसभेच्या अध्यक्षपदावर हक्क सांगितला आहे. त्याचप्रमाणे 'जेडीयु'ने 'एक देश एक निवडणूक' या मुद्द्यावर सहमती दर्शवली असली तरी अग्निवीर योजनेबाबत पुनर्विचार करावा, असे सुचवले आहे. 

आणि म्हणूनच आगामी पाच वर्षे 'भाजपला आपल्या मनाप्रमाणे कारभार करता येईल का ?' हा महत्त्वाचा विषय सध्या देशात चर्चिला जात आहे. यामध्ये समान नागरी कायदा, अनेक आंतरराष्ट्रीय विषयावरील निर्णय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात येणारे निर्णय, आर्थिक धोरण, जनतेला द्यावयाच्या सुविधांवर योजना, पेट्रोलियम पदार्थाचे दर, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर एनडीएतील घटक पक्ष भाजपला जेरीस आणण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर मोदी-शहा काय आणि कसा निर्णय घेतात ? यावरच सहमतीचे राजकारण अवलंबून असणार आहे.