Sangli Samachar

The Janshakti News

चंद्राबाबू भाजप सोबत आले तरीही त्यांच्या इतिहासावरच साऱ्यांचं लक्ष !सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर 272 हा बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. मात्र, इंडिया आघाडीने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर असली, तरी एनडीएने बहुमत मिळवल्यामुळे भाजपचा तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचा प्रयत्न होत आहे. एनडीएचा बहुमताचा आकडा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्षांमध्ये टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, ते कधीही भाजपचा गेम करू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत असून त्यांचा इतिहास तेच सांगतो.

भाजपनंतर एनडीएमध्ये टीडीपीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू ‘किंगमेकर’ ठरत आहेत. या निवडणुकीत टीडीपीने 16 जागा जिंकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमारांची जेडीयू आहे. त्यांना 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीएचे सरकार स्थापनेसाठी भाजपला टीडीपी तसेच नितीशकुमार यांच्या जेडीयूवर अवलंबून राहावं लागेल. या राजकीय परिस्थितीत चंद्राबाबू नायडूंवर विश्वास ठेवता येईल का? कारण जर काहीसं मागे वळून पाहिलं तर पाठींब्यासाठी चंद्राबाबूंवर कितपत विश्वास ठेवावा? हा प्रश्नच आहे. याबाबतीत चंद्राबाबूंचा रेकॉर्ड तसा फारसा बरा नाही, याची साक्ष इतिहासातील काही घटना देतात.


आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबत नायडू यांनी याआधी मार्च 2018 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंध तोडले होते. त्यानंतर चंद्राबाबू नायडू सहा वर्षांनी मार्च 2024 मध्ये एनडीएमध्ये सहभागी झाले. आंध्र प्रदेशात भाजप आणि जनसेनासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली. युतीच्या अंतर्गत राज्यातील एकूण 175 विधानसभा जागांपैकी टीडीपीनं 144, जनसेनेनं 21 आणि भाजपनं 10 जागा लढवल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नायडू यांच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. ते सर्वाधिक काळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी 13 वर्ष 247 दिवस अनेक टर्म मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. मात्र, त्यांचा आणि त्यांच्या पक्षाच्या इतिहास पाहता ते भाजपचा कधीही गेम करू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.