Sangli Samachar

The Janshakti News

निकालाआधी मुंबईत वेगवान घडामोडी, फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत, त्याआधी मुंबईमध्ये वेगवान घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसंच राज ठाकरेंनी कोकणात नारायण राणेंसाठी, पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी तर ठाण्यात नरेश म्हस्के यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. याशिवाय महायुतीच्या प्रचाराची तोफ शिवाजी पार्कमध्ये थंडावली, तेव्हा राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.


लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला पाठिंबा दिला असला तरी विधानपरिषद निवडणुकीवरून मात्र दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे तर मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे यावर फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.