Sangli Samachar

The Janshakti News

शिंदे - फडणवीसांचे मराठवाड्यातील दोन डझन आमदार 'डेंजरझोन'मध्ये ?

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठा फायदा झाला असून तब्बल सात जागा मिळाल्याने येत्या काळात उत्साह दुणावला आहे. त्याचे परिणाम आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत होणार आहेत. मराठवाड्यातील 46 पैकी 22 आमदारांच्या विरोधात कौल दिसत आहे. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, सावे, निलंगेकर यांच्यासह महायुतीचे 21 तर महाविकास आघाडीच्या एका आमदाराचा करेक्ट कार्यक्रम होणार, असल्याची चर्चा आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित असताना शिवसेनेचे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे यश मिळवले होते. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्याचा फटका मोठ्याप्रमाणात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सहन करावा लागला. त्यानंतर दोन्ही पक्षाचे संख्याबळ कमी झाले. त्यानंतर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व घडामोडीचा परिणाम पहावयास मिळाला. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास महायुतीचे 21 तर महाविकास आघाडीचा एक आमदार डेंजर झोनमध्ये आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे मंत्री संदिपान भुमरे हे चांगल्या मताधिक्यांने निवडून आले. शिवसेना शिंदे गटाचे शहर पश्चिमचे विद्यमान आमदार संजय शिरसाट, ग्रामीणमधील वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या तीनही मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांना मोठे मताधिक्य मिळाले. तर शहरातील शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मध्य व भाजपचे पूर्वचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात मात्र भुमरे यांची पिछेहाट झाल्याचे दिसून आले. येथे 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली. त्यामुळे मंत्री अतुल सावे, प्रदीप जैस्वाल यांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कन्नडमध्ये भुमरे यांना आघाडी मिळाली. त्यामुळे ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत यांना फटका बसणार आहे.

हिंगोलीतील चार आमदारासाठी धोक्याची घंटा

हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारली. या सहाही मतदारसंघात आष्टीकर यांना आघाडी आहे. हिंगोली मतदारसंघात 3 विधानसभा मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यातील, दोन नांदेड जिल्ह्यातील तर एक मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील आहे. त्यामुळे हिंगोलीतील भाजपचे तानाजी मुटकुळे, कळमनुरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संतोष बांगर, वसमतमध्ये अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे तर किनवटमधील भाजपचे भीमराव केराम हे आमदार अडचणीत आहेत. हदगावमध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना मात्र फायदा होणार आहे.

नांदेडमधील दोन आमदारांना फटका

नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण हे विजयी झाले. भोकरमध्ये अशोक चव्हाण काँग्रेसचे आमदार होते त्यांनी राजीनामा दिला आहे. वसंत चव्हाण यांना आघाडी मिळाल्याने देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर, नांदेड दक्षिणमधील काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे तर चिखलीकरांच्या लीडमुळे मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड यांना फायदा होणार आहे तर वसंत चव्हाण यांना लीड मिळाल्याने नांदेड उत्तरमधील शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर, नायगावमध्ये भाजपचे राजेश पवार या दोन आमदारांना फटका बसणार आहे.

बीडमधील दोन आमदार डेंजर झोनमध्ये

बीडमधील चुरशीच्या लढतीत बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली. सोनावणे यांना लीड मिळाल्याने त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांचा तर पंकजा मुंडेंना लीड मिळाल्याने आष्टीमध्ये भाऊसाहेब आजबे, परळीतून धनंजय मुंडे, माजलगावचे प्रकाश सोळंके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदाराचा फायदा होणार आहे तर केजच्या भाजपच्या नमिता मुंदडा, गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मतदारसंघात सोनावणे यांना आघाडी मिळाल्याने त्यांना फटका बसणार आहे.

लातूरमधून काँग्रेसचे शिवाजी काळगे मोठ्या फरकाने विजयी झाले. लातूर शहरचे अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख, लोहाचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांना काळगेना असलेल्या आघाडीचा तर उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे, अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात भाजपचे शृंगारे यांना फायदा होणार आहे. निलंग्याचे भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या मतदारसंघात काँग्रेसला आघाडी असल्याने अडचणीत वाढ होऊ शकते.

धाराशिवमध्ये पाच जणांना दणका

धाराशिव लोकसभा मतदारसंघात धाराशिवमधील चार तर लातूर जिल्ह्यातील औसा तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना सहा मतदारसंघात मिळालेले लीड धाराशिवमधील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना फायदा होणार आहे. तर तुळजापूरमधील भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील, औशातील भाजपचे अभिमन्यू पवार, उमरग्यातील शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले तर बार्शीतील अपक्ष राजेंद्र राऊत, परंडा मतदारसंघातील मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

जालन्यातील चार जणांना बसणार फटका

जालना जिल्ह्यात काँग्रेसचे कल्याण काळे यांनी विजय खेचून आणला. जालन्यात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मतदारसंघात आघाडी आहे. तर भाजपचे आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघातून रावसाहेब दानवेंना दोन हजाराचे मताधिक्य मिळाले तर बदनापूरधील भाजपचे नारायण कुचे, सिल्लोडमधील शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल नबी सत्तार, फुलंब्रीचे भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे व पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या काळे यांना लीड असल्याने हे चार आमदार डेंजर झोनमध्ये आहेत.

परभणीतील दोघांचा करेक्ट कार्यक्रम

परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले. परभणीत ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्या मतदारसंघात व घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे, पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मतदारसंघात जाधवांना आघाडी आहे. तर गंगाखेडमध्ये रासपचे आमदार असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या मतदार संघात महादेव जानकारांना आघाडी आहे, जिंतूरमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डीकर, परतूरमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघात संजय जाधवांना लीड असल्याने या दोन जणांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसणार आहे.