Sangli Samachar

The Janshakti News

लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणणार ! "पण..." - महेश कोठारे"| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जून २०२४
महेश कोठारे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते. 'धूमधडाका', 'थरथराट', 'धडाकेबाज', 'झपाटलेला' असे विविध धाटणीचे सिनेमे महेश कोठारेंनी भेटीला आणले अन् प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. महेश कोठारे आगामी 'झपाटलेला ३' सिनेमाचं शूटींग करत आहेत. काहीच दिवसांपुर्वी या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सिनेमाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डेंना AI च्या माध्यमातून समोर आणण्यासाठी महेश कोठारे उत्सुक आहेत. याविषयी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केलं.

AI च्या माध्यमातून पुन्हा लक्ष्या दिसणार?

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिलीय. महेश कोठारे म्हणाले, "माझी खूप इच्छा आहे की लक्ष्याला रिक्रिएट करुन आणावं. पण त्यासाठी मला परवानगी घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपुर्वी मला प्रिया बेर्डेचा फोन आला. लक्ष्याला तुम्ही AI च्या माध्यमातून पुन्हा आणणार का? मला न विचारता तुम्ही ही गोष्ट करणार का? असं तिने मला विचारलं. मी प्रियाला सांगितलं, असं कसं! तुला विचारुनच मी ही गोष्ट आणणार. तुझी परवानगी असेल तरच आपण पुढे जाऊ."


'झपाटलेला ३' निमित्ताने लक्ष्या दिसणार?

महेश कोठारे पुढे म्हणाले, "माझी इच्छा आहे की प्रियाने यासाठी मला परवानगी द्यावी." दरम्यान काही दिवसांपुर्वी 'झपाटलेला ३' सिनेमाची घोषणा झाली. आदिनाथ कोठारे सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. महेश कोठारे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 'झपाटलेला 3' निमित्त महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डेंना पुन्हा रिक्रिएट करण्याची शक्यता आहे. सर्व जुळून आलं तर लक्ष्याचा अभिनय पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी आपल्याला मिळेल. २०२५मध्ये 'झपाटलेला 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.