Sangli Samachar

The Janshakti News

भारतातील 'ही' सुंदर ठिकाणे पाहणं भारतीयांसाठी मुश्किल; नागरिकत्व असूनही NO ENTRY



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
जर तुम्हाला फिरायची आवड असेल तर संपूर्ण देशभरातील अनेक ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये असतील. यामध्ये कदाचित अरुणाचल, लडाख, सिक्कीम यांचाही समावेश असेल. 

एखाद्या ठिकाणी पर्यटक म्हणून जायचं म्हटलं की, नियम आणि अटींची पूर्तता ही आलीच. देशाबाहेर लागू होणारा हा नियम देशातही लागू होतो याबाबत तुम्हाला माहित आहे का? भारतीयांना भारतीय नागरिक असूनही देशाच्या सर्व भागांना थेट भेट देण्याची परवानगी नाही. अशा काही ठिकाणांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जिथे सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय नागरिकांनाही इनर लाइन परमिट घ्यावा लागतो.

लडाख -

लडाखचा बराच भाग पाकिस्तान आणि चीनच्या सीमांना लागून असल्याने इथे सहज प्रवेश मिळत नाही. तास प्रयत्न केल्यास चुशूल आणि हानले येथून तुम्हाला लष्कराकडून परत पाठवले जाते. लडाखमधील काहीच भागांसाठी हा नियम आहे. उंच डोंगररांगा आणि निसर्गाचे असीम सौंदर्य पाहायचे असेल तर पँगॉन्ग त्सो, त्सो मोरीरी, न्योमा, नुब्रा व्हॅली, तुर्तुक, खार्दुग ला, त्याक्षी, डिगर ला, टांगयार, न्योमा, हनु व्हिलेज, मॅन यांसारख्या प्रतिबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी इनर लाइन परमिट आवश्यक आहे. जो लेह शहरातील डीसी ऑफिसमधून मिळतो.


अरुणाचल प्रदेश -

भारताच्या उत्तर-पूर्व भागातील अरुणाचल प्रदेशाचे सौंदर्य अत्यंत नेत्रदीपक आहे. त्यामुळे इथे फिरायला जावे कुणाला वाटणार नाही? पण अरुणाचलमध्ये प्रवेश करायचा असेल तर ILP आवश्यक आहे. कारण, हा प्रदेश चीन आणि म्यानमारला जोडणारा मर्यादित क्षेत्राच्या यादीतील प्रदेश आहे. त्यामुळे तवांग, रोइंग, इटानगर, बोमडिला, झिरो, भालुकपॉन्ग, पासीघाट, अनिनी भागात आपल्याला परमीटशिवाय प्रवेश करता येत नाही.

लक्षद्वीप -

लक्षद्वीप अर्थात एक लाख बेटे. निळ्या पाण्याने वेढलेली आणि स्वच्छ पांढऱ्या वाळूने वेढलेली ही उत्कृष्ट बेटे केरळपासून केवळ ३०० किमी अंतरावर आहेत. मात्र हे सौंदर्य न्याहाळायचे असेल तर भारतीयांना प्रवेशासाठी परमिट आवश्यक आहे. या बेटांच्या एकत्रीकरणामध्ये ३६ बेटांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ १० बेटांवर आपला अधिकार असून यातील काहीच भागांत प्रवेश घेता येतो. तर इतर कोणत्याही भागात प्रवेश करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे.

नागालँड -

नागालँडमधील कोहिमा, दिमापूर, मोकोकचुंग, वोखा, मोन, फेक, किफिरे ही पर्यटन स्थळे एक्स्प्लोर करायची असतील इनर लाइन परमिट (ILP) आवश्यक आहे. परवाना मिळाल्यास तुम्ही Dzukou व्हॅली, Japfu शिखर, कोहिमा संग्रहालय, Touphema टाउन तुम्ही भेट देऊ शकता.

मिझोराम -

मिझोराममधील सुंदर भावनिक देखावे आणि अद्भुत वातावरणाची अनुभूती घ्यायची असेल तर इनर लाइन परमिट घ्यावा लागतो. खास करून फावंगपुई हिल्स, वांटवांग फॉल्स, पालक तलाव, छिंगपुई या ठिकाणी जायचे असेल ILP गरजचा आहे.

सिक्कीम -

सिक्कीम तीन देशांना लागून असलेला प्रतिबंधित भाग आहे. त्यामुळे सिक्कीममधील काही भागात प्रवेश करण्याआधी परवाना लागतो. यामध्ये त्सोमगो लेक, नाथू ला, झोंगरी आणि गोएचाला ट्रेक, युमथांग, युमेसामडोंग, थांगू/चोपटा व्हॅली, गुरुडोंगमार तलाव यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.