Sangli Samachar

The Janshakti News

निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे जाणार अज्ञातवासात !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १२ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागणार आहे, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच सुनावले आहे. 

आपल्या भाषणांमधून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे आता बावचळले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीनंतर दोघांनाही अज्ञातवासात जावं लागेल, अशी महाराष्ट्राची जनता त्यांची स्थिती करणार आहे,' असा सणसणीत टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.


पुढे बावनकुळे असेही म्हणाले की, 'महाराष्ट्राचे जनमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आहे. नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा वर्षांत केलेली विकासाची कामं जनतेसमोर मांडली आहेत. महाराष्ट्रामध्ये अंदाजानुसार आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतं मिळतील. तसेच नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता महाराष्ट्र पुन्हा एकदा खंबीरपणे त्यांच्यामागे उभा राहील,' असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राज्यात महाविकास आघाडीच्याा ३० हून अधिक जागा निवडून येतील, असा दावा शरद पवार यांनी केला असून त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला. 'शरद पवारांची बारामतीमधील जागाच निवडून येणार नाही आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडून येतील. आता बारामतीच त्यांच्याकडे राहिली नाही तर महाराष्ट्र कसा राहील, हा प्रश्न आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडील तुतारी काही वाजणार नाही,' अशी टीका बावनकुळे यांनी शरद पवारांवर केली आहे.