Sangli Samachar

The Janshakti News

वाघिणीला वेढा : आणखी १५ चालक, गाईड निलंबित; ताडोबा व्यवस्थापनाची कारवाई !



| सांगली समाचार वृत्त |
चंद्रपूर - दि. २८ मे २०२४
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) 'टी ११४' या वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या आणखी १५ जिप्सी चालक आणि गाईड्सवर एक आठवडा निलंबनाची व तीन हजार रुपये दंडाची कारवाई ताडोबा व्यवस्थापनाने केली आहे. दोन दिवसांत २५ चालक व गाईड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक, जिप्सी वाहन चालक आणि गाईड यांचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आला. व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये 'टी ११४' वाघीण रस्त्यावर आली असता वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली. वाहन आणि त्यावर स्वार पर्यटकांच्या गर्दीत वाघीण पूर्णतः अडकली. या प्रकारामुळे ताडोबातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. वन्यप्रेमींकडून याबाबत संताप व्यक्त होताच ताडोबा व्यवस्थापनाने सर्वप्रथम दहा वाहन चालक आणि मार्गदर्शकांवर निलंबनाची कारवाई केली. प्रत्येक वाहनधारकावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. ताडोबात नियम मोडण्याची ही आतापर्यंतची सर्वात भीषण घटना असल्याचे सांगितले जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात पर्यटन सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विस्तृत नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेत वाहन चालक, गाईड आणि पर्यटकांनी या नियमांची पायमल्ली केल्याचे आणि वाघासोबतच आपलाही जीव धोक्यात घातल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

पर्यटक वाहनांमध्ये ही वाघीण पूर्णत: अडकली होती. तिच्या देहबोलीवरून ती अस्वस्थ आणि घाबरलेली असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. या घटनेनंतर ताडोबा व्यवस्थापनाने वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या वाहनांवरील गाईड यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले, तर चालकांवर कायमची बंदी लादण्यात आली. प्रत्येक वाहनावर तीन हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

यानंतर ताडोबा बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी सलग दुसऱ्या दिवशी १५ वाहनचालक आणि पर्यटक मार्गदर्शकांवर कारवाई केली. 'एनटीसीए'च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पर्यटनादरम्यान नियमांचे पालन करा, अन्यथा वाहनाचा परवाना रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघांचे मार्ग अडविण्याचा प्रकार ताडोबा प्रकल्पात वारंवार होत असल्याने येथील व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर वन्यजीव प्रेमींकडून टीका होत आहे. व्यवस्थापनाने आता तरी पर्यटन वाहनावर विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. आता पर्यटक वाहनांवर 'बघीरा ॲप'द्वारे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तसेच चालक व मार्गदर्शकांची बैठक घेऊन आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ताडोबाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी दिली.