Sangli Samachar

The Janshakti News

'उद्धव ठाकरेंनंतर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता; पण ते अजितदादा नव्हते, तर शरद पवारसाहेब होते - उमेश पाटील

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२४
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता. मात्र, तो अजितदादांऐवजी दुसरी व्यक्ती होती. आणि याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती. ते नाव फक्त आमचे त्यावेळचे वरीष्ठ नेते, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच माहीत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाला महाविकास आघाडीत असताना अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. खुद्द संजय राऊत यांचाच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याला विरोध होता. मात्र, ते अजित पवार, वळसे पाटील आणि तटकरेंचे नाव घेत धांदात खोटे बोलत आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.


उमेश पाटील म्हणाले, शरद पवार यांनी तीनही पक्षाच्या बैठकीत हात वर करून उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, असे पवारांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीतील अजितदादा, वळसे पाटील, तटकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध केला होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने मुख्यमंत्री व्हावे लागले होते, असे चुकीचे संजय राऊत सांगत आहेत.

संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर देताना उमेश पाटील म्हणाले, राजकारणात सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगितल्या जात नाहीत. पण, आमचे वरिष्ठ नेते आणि संजय राऊत यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे, तर त्यानंतरच्या अडीच वर्षांनंतर एक वेगळे नाव ठरले होते. त्या नावाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्याबाबतही अजित पवार, वळसे पाटील, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना माहिती देण्यात आली नव्हती, असा दावाही पाटील यांनी केला.

अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता. पण, अजित पवार यांच्या व्यतिरिक्त आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या डोक्यात जे नाव होतं. ते नाव फक्त संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनाच माहिती होते. हे संजय राऊत यांना सर्वकाही माहिती आहे. हवं तर त्यांनी याबाबत पुन्हा एकदा खुलासा करावा, असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले.