Sangli Samachar

The Janshakti News

तिसरी ते बारावी अभ्यासक्रम बदलणार... भगवत गीता, मनाचे श्लोक यांचा अभ्यासक्रमात समावेश होणार !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२४
राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता आणि मनाचे श्लोक यांचा समावेश करण्यात येणार आहे. भाषा विषयात यांचा समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अनेक माध्यमांच्या शाळा आहेत. आपल्या मुलांना परंपरेची ओळख करुन त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने आक्षेप आणि सूचना मागविल्या आहेत. SCERT ने विद्यार्थ्यांना भगवत गीता आणि मनाचे श्लोक यांचा पाठ करायला लावावे असे सूचवले आहे.

SCERT ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना देशाची परंपरा आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक आणि भगवत गीतेचा बारावा अध्याय पाठ करायला लावावा असे एससीईआरटीने सुचविले होते. त्यानुसार आता इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 ते 25 मनाचे श्लोक, 6 वी ते 8 वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9 वी ते 12 वीसाठी भगवत गीता पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. भगवत गीतेमधील बारावा अध्याय विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी द्यावा असे सांगितले आहे.


भगवत गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. तो शाळांमध्ये शिकविण्यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांचा विरोध होऊ शकतो. 

आराखड्यात नमूद केले की...

भारतीय ऋषींची दिनचर्या, भगवतगीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, गुरुशिष्य परंपरा, ऋषींचा आहार कसा होता याची ओळख विद्यार्थ्यांना करुन द्यावी. तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश गणित व विज्ञान विषयात करावा असे एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्यात म्हटले आहे.

गुजरात सरकारचा निर्णय

गेल्या काही वर्षांपूर्वी गुजरात सरकारने भगवत गीतेचा समावेश 6 ते 12 वीच्या शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या परंपरांशी विद्यार्थ्यांना जोडणे तसेच त्यांच्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे असा यामागील उद्देश असल्याचे गुजरात सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते.