| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२४
जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी कधीही वाया जाऊ देणार नाही, माझी उमेदवारी ही जनतेनेच ठरवलेली होती, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
पदमाळे या आपल्या जन्मगावी मतदान करून, त्याने संपूर्ण मतदारसंघाचा धावता दौरा केला. यावेळी मिरज येथे बोलताना विशाल पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील मतदारांना बदल हवा आहे म्हणूनच इतक्या उन्हातही लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत, वाढत्या उन्हात तरुण व ज्येष्ठ नागरिकांनीही दोन-तीन तास रांगेत थांबून मतदानाचा हक्क बजावला याबद्दल खरोखरच त्यांचे कौतुक करायला हवे. यावेळी त्यांनी प्रशासनाचेही आभार मानले. प्रशासनाने निश्चितच चांगली कामगिरी केली आहे. परंतु काही ठिकाणी मतदान यंत्रे उलट ठेवणे, मतदान केंद्राच्या बाहेर मतदान यंत्राबाबत लावलेले माहितीपत्रक हे चुकीचे होते. परंतु जागरूक मतदार व कार्यकर्त्यांनी हा विरोधकांचा डाव उधळून लावला आहे. पराभव दिसू लागल्यामुळे काही ठिकाणी प्रशासनाला हाताशी धरून असे प्रकार केलाचा आरोप विशाल पाटील यांनी यावेळी केला. परंतु हा प्रकार यशस्वी होणार नाही माझा विजय हा निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.